पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती टळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

अक्षरशः संतोष माने प्रकरणाची आठवून करुन देणारा हा  थरारक प्रसंग मंगळवारी रात्री शिवाजीनगर परिसरात घडूनही त्याबाबत कुठेही वाच्यता झाली नाही, पण हाच प्रकार भरदिवसा घडला असता तर ! 

पुणे : मंगळवारी रात्री पावणे दहा वाजताची वेळ. शिवाजीनगर एसटी स्थानकात चावी लावून चालु ठेवलेली 'पुणे उस्मानाबाद' ही शिवशाही बसच्या चालकाच्या सीटवर मद्यधुंद अवस्थेतील अमोल चोले हा दुसराच चालक बसतो. प्रवाशांनी भरलेली बस घेऊन तो सरळ एसटी स्थानकाच्या बाहेर येतो, प्रवाशांना काही कळायच्या आतच भरधाव बस मुख्य रस्त्याला लागते आणि काही अंतरावरच एका रिक्षाला धडकते. 

अक्षरशः संतोष माने प्रकरणाची आठवून करुन देणारा हा  थरारक प्रसंग मंगळवारी रात्री शिवाजीनगर परिसरात घडूनही त्याबाबत कुठेही वाच्यता झाली नाही, पण हाच प्रकार भरदिवसा घडला असता तर ! 

संतोष माने या माथेफिरु एसटी चालकाने 25 जानेवारी 2012 या दिवशी सकाळच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातून स्वतः मद्यधुंत अवस्थेत असताना एसटी बस स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतर शहरात बेदरकारपणे एसटी बस चालवून त्याने नऊ जणांचे जीव घेतले, 27 जणांना गंभीर जखमी करून 40 ते 50 वाहनांचे नुकसान केले.

ही घटना अजूनही पुणेकर विसरलेले नाहीत. याच घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी रात्री शिवाजीनगरसारख्या नेहमी गजबजलेल्या परिसरात घडली. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे आणि एका रिक्षाला धडक बसल्याने ही दुर्घटना टळली. अमोल विठ्ठल चोले (वय 33, रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जिन्नसराव ओव्हाळ (वय 57, रा. येरवडा) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 
...तेव्हा नेमके काय घडले ! 

फिर्यादी हे शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये सहाय्यक वाहतुक निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. तर चोले हा शिवाजीनगर आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. चोले याची मंगळवारी साप्ताहीक सुट्टी होती. तरीही तो मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये आला.

"पुणे-उस्मानाबाद' ही शिवशाही त्यावेळी एसटी स्थानकात थांबली होती. बसमध्ये प्रवासी व वाहक होते. तर चालक बस चालू अवस्थेत ठेवून नियंत्रण कक्षामध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी गेले होते. तेवढ्यात मद्यधुंत अवस्थेतील चोले हा तेथे आला. तो थेट चालकाच्या बाजुने शिवशाही बसमध्ये आला. त्याने तेथून प्रवाशासह बस पळवून नेण्यास सुरूवात केली. दरम्यान, बस निघाल्याने प्रवाशी निश्‍चिंत होते. मात्र, एसटी स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर त्याने वेगात बस पळविण्याचा प्रयत्न केला.

चौकातून डाव्या बाजुने बस मुख्य रस्त्याला आणून पुढे घेऊन जात असताना लोकमंगल कार्यालयामोर एका रिक्षाला बसने धडक दिली. त्यानंतर वाहक, प्रवासी बाहेर आले. त्यावेळी दुसराच वाहक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा प्रकार शिवाजीनगर पोलिसांना कळवून चोले विरुद्ध गुन्हा करुन त्यास अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी.ए.बिडवे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drunken driver tried ti hijack st bus in Pune