वडगाव शिंदेमध्ये दारूड्या पतीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा - दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पतीचा खून करणाऱ्या पत्नीला तसेच पुरावा नष्ट करण्यास मदत करणाऱ्या तिच्या भावाला लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

कोरेगाव भीमा - दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पतीचा खून करणाऱ्या पत्नीला तसेच पुरावा नष्ट करण्यास मदत करणाऱ्या तिच्या भावाला लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

लोहगावजवळ वडगाव शिंदे गावात सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेबाबत लोणीकंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगावजवळ वडगाव शिंदे गावात कांबळे कुटुंबीय राहण्यास आहे. दारूचे व्यसन असलेला नीलेश कांबळे दारू पिऊन पत्नीला नेहमी मारहाण करून त्रास देत असे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारीही होता. त्यामुळे संसार चालविण्यासाठी त्याची पत्नी विद्या घरकाम करत होती. त्यांना १५ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षांचा मुलगा आहे. सोमवारी रात्रीही दारू पिऊन आलेल्या नीलेश भीमाजी कांबळे (वय ३५, रा. वडगाव शिंदे) याचा त्याची पत्नी विद्या कांबळे (वय ३०) हिनेच खून करून मृतदेह अंगणात लाकडे, कपडे आणि ज्वलनशील इंधनाचा वापर करून जाळला. तसेच या घटनेत मृताची हाडे व राख गटारात व घरामागील सेफ्टी टॅंकमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्यास मदत करणारा तिचा भाऊ किशोर गायकवाड (वय ४०) यानेच मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याबाबत लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल करून विद्या कांबळे व किशोर गायकवाड यांना गुरुवारी अटक केली.

याबाबत सुरवातीला विद्या कांबळे हिने मुलीने जेवण भरविण्यास नकार दिल्यामुळे वडिलांनी मुलीला चावा घेत मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी मुलीने वडिलांना ढकलल्यामुळे त्यांचे डोके भिंतीवर आदळून मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिस व न्यायवैद्यक पथकाच्या तपासात विद्या हिनेच खून केल्याचे व भावाच्या मदतीने पुरावा नष्ट केल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Drunken husband murder in wadgaon shinde