कोरड्या डोळ्यांवर जालीम उपचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

वातानुकूलित यंत्रणा, सतत मोबाईल फोनचा वापर, संगणकावर तासन्‌ तास काम करणं हे आता तुमच्या डोळ्यांसाठी त्रासदायक ठरतंय नं? तुमचे डोळे कोरडे पडत असतील, पापणीची उघड-झाप करताना त्रास होत असेल, तर तुमच्या डोळ्यातील मेबोमीयम या ग्रंथीचे कार्य बिघडलंय अशी एक शक्‍यता असते. त्याचं नेमकं निदान आणि उपचाराची "लिपी फ्लो' ही सुविधा राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेत (एनआयओ) उपलब्ध झाली आहे. पुण्यातील ही अशा प्रकारची पहिली सुविधा आहे.

पुणे - वातानुकूलित यंत्रणा, सतत मोबाईल फोनचा वापर, संगणकावर तासन्‌ तास काम करणं हे आता तुमच्या डोळ्यांसाठी त्रासदायक ठरतंय नं? तुमचे डोळे कोरडे पडत असतील, पापणीची उघड-झाप करताना त्रास होत असेल, तर तुमच्या डोळ्यातील मेबोमीयम या ग्रंथीचे कार्य बिघडलंय अशी एक शक्‍यता असते. त्याचं नेमकं निदान आणि उपचाराची "लिपी फ्लो' ही सुविधा राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेत (एनआयओ) उपलब्ध झाली आहे. पुण्यातील ही अशा प्रकारची पहिली सुविधा आहे.

पुण्यात डोळ्यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या सुमारे 40 टक्के रुग्णांना "ड्राय आय सिंड्रोम' झालेला असतो. रात्रंदिवस डोळ्यापुढे मोबाईल आणि दिवसभर वातानुकूलित कार्यालयात संगणकापुढे काम या जीवनशैलीचा हा एक दुष्परिणाम आहे. अशा 40 टक्के रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये "एमजीडी' म्हणजे मेबोमीयम ग्रंथीचे कार्य बिघडलेले दिसते. याचे योग्य निदान आणि उपचाराची सुविधा आता पुण्यात निर्माण झाली आहे.

"एनआयओ'चे संचालक नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर म्हणाले, 'अश्रूंच्या तीन स्तरांपैकी एक म्युक्रस असतो. म्युक्रसमुळे आपल्या डोळ्याच्या आतील पाणी बुब्बुळावर चिकटून राहते. त्यावर तेलाचा बारीक थर असतो. हे तेल पापणीच्या खालच्या भागातून तयार होऊन ते बुब्बुळावर पसरते, त्यामुळे डोळ्यातील घर्षण कमी होते. तसेच, तेलामुळे डोळ्याभोवतीच्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. त्यात ओलावा कायम राहतो. काही रुग्णांमध्ये डोळ्यात कोरडेपणा येऊन पापणीच्या खाली ही तेल निर्माण करणारी प्रक्रिया थांबली जाते, त्याला "एमजीडी' म्हणतात.''
'डोळ्याच्या कोरडेपणावर 85 टक्के रुग्णांना या "लिपी फ्लो'च्या "थर्मल ट्रीटमेंट'चा फायदा होतो. त्यापैकी 60 टक्के रुग्णांना "ड्राय आय सिंड्रोम'साठी वापरले जाणारे औषध टाकावे लागत नाही. ही ट्रीटमेंट वर्षातून एकदाच घ्यावी लागते,'' असे डॉ. जाई केळकर व डॉ. योगेश चौगुले यांनी सांगितले.

मशिनमधून काय समजते?
- तुमच्या पापणीची उघड-झाप पूर्ण होते का?
- बुब्बुळावरील तेलाचा थर किती आहे?
- तेल निर्माण करणाऱ्या पेशींची सद्यःस्थिती काय?

केवळ बारा मिनिटांत उपचार
'लिपी फ्लो'हे उपकरण रुग्णाच्या डोळ्यांच्या पापण्यांवर बसविले जाते. याचे तापमान 42.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढविले जाते. त्या वेळी सतत दोन मिनिटांसाठी डोळ्याच्या पापणीवर तीन पाउंड वजन प्रतिचौरस इंचने दाब (पीएसआय) देण्यात येतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हा दाब पुन्हा दोन मिनिटांसाठी 0.1 ते 3.3 "पीएसआय'पर्यंत वाढविला जातो आणि नंतरच्या टप्प्यात परत दोन मिनिटांसाठी पापणीवरचा दाब 5.5 "पीएसआय'पर्यंत वाढवितात. अशा प्रकारे दोन वेळा म्हणजे 12 मिनिटांनी हे उपचार करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry Eyes Treatment Healthcare