‘डीएसके शिवाजीयन्स’ला ग्राहक मंचचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परत करण्यास नकार देणाऱ्या डीएसके शिवाजीयन्स फुटबॉल क्‍लबला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दणका दिला आहे. तक्रारदाराने दिलेले १ लाख ४३ हजार ७५० रुपयांचे शुल्क ९ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश मंचने क्‍लबला दिला आहे.

पुणे - प्रवेश रद्द केल्यानंतर शुल्क परत करण्यास नकार देणाऱ्या डीएसके शिवाजीयन्स फुटबॉल क्‍लबला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दणका दिला आहे. तक्रारदाराने दिलेले १ लाख ४३ हजार ७५० रुपयांचे शुल्क ९ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश मंचने क्‍लबला दिला आहे.

ग्राहक मंचचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्या क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी हिंजवडी येथे राहणाऱ्या महादेव दुबे आणि त्यांचा मुलगा मानस दुबे यांनी डीएसके शिवाजीयन्स फुटबॉल क्‍लब आणि क्‍लबच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात मंचात तक्रार दाखल केली होती. मानस याने क्‍लबच्या लिव्हरपूल एफसी इंटरनॅशनल ॲकॅडमीमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी प्रवेश घेतला होता. त्याचे शुल्क प्रतिवर्षी पाच लाख रुपये होते. त्याने त्यातील १ लाख ४३ हजार ७५० रुपये ॲकॅडमीकडे जमा केले.

मानसच्या शाळेच्या प्राचार्यांनी काही कारणांमुळे त्याला ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे महादेव दुबे यांनी ॲकॅडमीकडे प्रवेश रद्द करून शुल्क परत करण्याची मागणी केली. 

ॲकॅडमीने पैसे परत देण्यास नकार दिल्याने दुबे यांनी मंचात धाव घेतली. शुल्काचे पैसे आणि मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार मंचने शुल्काचे पैसे व्याजासह आणि मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये तक्रारदाराला देण्याचा आदेश क्‍लबला दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DSK Shivajians Football Club Customer forum