बारामतीत गटशिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षण विभागाच्या कामकाजावर परिणाम

मिलिंद संगई
रविवार, 12 ऑगस्ट 2018

बारामती : येथील पंचायत समितीला गेले दीड महिना उलटूनही पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी मिळत नसल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. केवळ बारामती तालुक्यापुरतीच ही अवस्था नसून जिल्ह्यात सहा ठिकाणी पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेरा तालुक्यांपैकी निम्म्या तालुक्यांच्या शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी अधिका-यांच्या जीवावर सुरु आहे. 

बारामती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांची बदली झाल्यानंतर बारामतीला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नियुक्त करण्यात आलाच नाही. अतिरिक्त गटविकास अधिका-यांकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून ते त्यांचे दैनंदिन कामकाज सांभाळून या पदाचीही जबाबदारी पार पाडत आहेत. साहजिकच शिक्षण विभागावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. 

एकट्या बारामती तालुक्याचा विचार केला तर येथे 395 शाळा असून अडीच हजारांवर शिक्षक प्राथमिक व माध्यमिक विभागात मिळून आहेत. 60 हजार विद्यार्थी या शाळातून शिक्षण घेतात. या वरुन या विभागाचा व्याप किती विस्तारलेला आहे याची कल्पना येते. 

नवीन भरती नाही व विस्तारअधिका-यांना बढतीच न दिल्याने गटशिक्षणाधिका-यांची पदे रिक्त असल्याची माहिती या निमित्ताने प्राप्त झाली आहे. शिक्षणाशी संबंधित हा विभाग असतानाही या कडे होणारे दुर्लक्ष आश्चर्यकारक असल्याचे मत सर्वांनीच व्यक्त केले आहे. 

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या योजनेसह अनेक योजना अधिकारीच नसल्याने प्रभावीपणे राबविल्याच जात नाहीत, प्रभारी अधिकारी पूर्ण क्षमतेने लक्ष देऊ शकत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम शिक्षण विभागाच्या कामकाजावर होत असल्याच्या तक्रारी आहेत. 

Web Title: Due to the absence of a group education officer in Baramat,work load on the education department