'डीबीटी'च्या पैशांअभावी विद्यार्थ्यांची उपासमार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

विद्यार्थ्यांचे पैसे मिळण्यात उशीर का झाला, याची कारणे वसतिगृह प्रमुखांना विचारली आहेत. "डीबीटी'ची सर्व थकीत रक्कम देण्याबाबत कार्यवाहीसुद्धा केली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत त्यांना निधी देण्यात येईल. 

- नितीन उदास, उपआयुक्त, समाज विकास विभाग 

पुणे : जेवणाचा खर्च भागवण्यासाठी काही विद्यार्थ्यांवर केटरिंगच्या कामाला जाण्याची वेळ आली आहे, काहींना एक वेळच्या जेवणावर दिवस काढावा लागत आहे, तर कोणावर उधारीचा डोंगर जमा झाला आहे. ही स्थिती आहे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची. थेट लाभ हस्तांरण (डीबीटी) योजनेंतर्गत महापालिकेकडून विद्यार्थ्यांना खानावळीसाठी दिले जाणारे पैसे महाविद्यालय सुरू होऊन 6 महिने उलटले, तरी मिळाले नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

वसतिगृहात सुमारे 350 विद्यार्थी वास्तव्यास असून, यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे त्यांना महापालिकेमार्फत मिळणाऱ्या खानावळीसाठीच्या पैशांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, शिक्षणाच्या माहेरघरातच प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांना हक्काच्या निधीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यातून त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या दिरंगाईमुळे सप्टेंबरमध्ये वसतिगृह सुरू होऊनही या विद्यार्थ्यांना अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. तसेच, द्वितीय आणि तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय जुलै महिन्यात सुरू होते, मात्र खानावळीचा निधी त्यांना सप्टेंबरपासूनच मिळतो. त्यातून दोन महिने त्यांना कसेबसे काढण्याशिवाय पर्याय नसतो.

तूर्त काही विद्यार्थ्यांची बरोबर शिकणाऱ्या मुलांच्या डब्यात जेवणाची सोय होत असली, तरी हे किती दिवस चालणार? हाही प्रश्‍न आहे. या पैशांबाबत वसतिगृहातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, हे पैसे दोन दिवसांत मिळतील, ऑडिट रिपोर्ट पालिकेला पाठवला आहे, निधी मिळेलच अशी उत्तरे मागील दोन महिन्यांपासून दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the DBT money students time to hunger