कोसळलेल्या बाजारभावामुळे कांद्याचा वांदा २ हजार कोटींचा!

onion.jpg
onion.jpg

येवला : कांद्याचे आगार असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागील २०१७-१८ वर्षाच्या तुलनेत चालू २०१८-१९ वर्षी अगदी कवडीमोल बाजारभाव मिळाल्याने प्रचंडहानी झाली आहे. जिल्ह्यातील या दोन वर्षाचा विचार करता शेतकऱ्यांना अंदाजे तब्बल दोन हजार कोटीची झळ यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत सहन करावी लागल्याचे मार्च अखेरीसचे आकडे सांगतात. शिवाय बाजार समित्यांच्या उत्पन्नातही शंभर कोटी पर्यंतचे नुकसान झाल्याचे आकडे सांगतात.

वर्षानुवर्ष जिल्ह्याचे नाव देशभरात कांदा उत्पादनातील अग्रेसर उत्पादक म्हणून घेतले जाते. दुष्काळी असलेल्या येवला, नांदगाव, चांदवड, मालेगाव मधील शेतकरी खरिपातील पोळ व रब्बीतील रांगड्या कांद्याला प्राधान्य देतात तर, बागायतदार असलेल्या निफाडसह दुष्काळी तालुक्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतात अशी येथील पीकपद्धती राहिली आहे.

खरे तर लाल कांद्याचे बाजारभाव नेहमी बेभरवशाचे असतात कारण त्यावेळी देशावरील व बाहेरील मागणीची गरज भागविण्यासाठी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक येथील कांदे बाजारात आलेले असतात. त्या तुलनेत साठवलेल्या उन्हाळ कांद्यातून मात्र चार पैसे मिळण्याची हमी शेतकऱ्यांना असते. त्यामुळे येवला, निफाड, चांदवड, सिन्नर या भागात तर इतर पिकांना दुर्लक्षून आता शेतकरी उपलब्ध पाण्यावर उन्हाळ कांद्यालाच प्राधान्य देत आहेत.

चालूवर्षी शासनाच्या धोरणाच्या अभावामुळे वर्षभर कांद्याचे बाजारभाव पडलेलेच राहिले. परिणामी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकवलेल्या कांद्याला ५० ते २२०० पर्यंतच भाव मिळाला. अर्थात वर्षभरातील भावाची सरासरी फक्त ७०० रुपयांच्या आसपासच राहिल्याचेही दिसते.त्यातुलनेत मागील २०१७-१८ मध्ये मात्र कांद्याने शेतकऱ्यांचे मनसोक्तपणे समाधान केले,त्यावेळी वर्षभर १०० ते ४८०० पर्यंत व सरासरी १५०० पर्यंत असे समाधानकारक भाव मिळाले,जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती राहिल्याने त्यावेळी कांदा पिकवलेले अक्षरशः नशीबवान ठरले.मात्र भावातील तेजीच्या अनुषंगाने चालू जिल्ह्यात कांद्याच्या लागवडीत २५ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली पण त्या तुलनेत विचार केल्यास उत्पन्न मात्र ७० टक्‍क्‍यांपर्यंत घटल्याचेही दिसते. उपलब्ध आकडेवारीचा विचार केल्यास लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, सिन्नर या बाजार समित्यांत २०१७-१८ मध्ये तब्बल २५०० कोटीचा कांदा विक्रीची उलाढाल झाली होती. हेच आकडे चालू वर्षी केवळ एक हजार १०० कोटीपर्यंतच गेले आहे. या चार बाजार समित्यांची ही अवस्था आहे तेव्हा जिल्ह्यातील इतर आकड्यांचा विचार न केलेला बरा. एकूणच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल २ हजार कोटीची उलाढाल मागील वर्षाच्या तुलनेत थंडावली असल्याचेही आकडे सांगतात.

“कधी बाजारभाव तर कधी शेतकऱ्यांप्रती राज्यकर्त्यांची असलेली असंवेदनशीलता आणि व्यवस्थेचा परिणाम होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झळ सहन करावी लागते. जिल्ह्यातील उलाढालीची तफावत पाहता हा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे आहे. शासनाने आता मदत दिली पण त्याला मर्यादा लावली आहे. कांदा अनुदानाच्या २०० क्विंटलची मर्यादा खूपच कमी आहे यात वाढ हवी होती.”
- उषाताई शिंदे, सभापती : कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला

“चाळीत ५ ते ६ महिने साठवलेल्या कांद्याला १५०० ते २००० हजाराचा भाव मिळाला तरच तो केलेल्या खर्चाचा विचार करता परवडतो. तीन-चार वर्षातून कधी तरीच चांगले भाव मिळतात, इतर वेळेस तर कवडीमोल दराने विक्री करावी लागते.मागील वर्षी तर भाव वाढीच्या प्रतीक्षेत चाळीत सात महिने साठवलेला कांदा १०० रुपये प्रतीक़्विटलने विक्री करावा लागला. कांदयातून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. यासाठी राज्यकर्त्यांनी धोरण निच्छित करण्याची गरज आहे.”
- आनंद आव्हाड, शेतकरी, काथरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com