आगीमुळे मावळातील डोंगर धोक्‍यात 

आगीमुळे मावळातील डोंगर धोक्‍यात 

वडगाव मावळ - येथील श्री वरदायिनी माता परिसरातील डोंगराला गेल्या तीन दिवसांपासून वणवा लागला असून, वारंवार वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची हानी होत असल्याने वनखात्याने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. 

सह्याद्रीच्या रांगेत येणारे मावळ तालुक्‍यातील अनेक डोंगर हे गवताचे आगार म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडही करण्यात आली आहे. डोंगरावर अनेक प्राण्यांचा वावर आहे. परंतु, उन्हाळ्यात डोंगरांना वणवा लागण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. येथील डोंगरवाडी पायथ्याला असलेल्या श्री वरदायिनी माता परिसरातील डोंगर गेल्या तीन दिवसांपासून जळत आहे. त्यामुळे जनावरांसाठी असलेला चारा नष्ट झाला आहे. अनेक जीवजंतू व प्राणीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. या परिसरात ससा, सायळ, काळका, तरस, कोल्हे, मोर, घुबड, भैरीससाणा, रानघार आदी प्राणी व पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या सर्वांना वणव्याची झळ पोचली आहे. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच, वणव्यांमुळे जंगली प्राणी महामार्गावर येऊन अनेकदा अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे वनखात्याने वणवे रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वरदायिनी मित्र मंडळाचे अध्यक्ष शंकर पडवळ यांनी केली आहे. वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. 

जनजागृती महत्त्वाची 
वणवे रोखण्यासाठी वन खात्याकडून पारंपरिक पद्धतीच्या उपाययोजना नेहमीच केल्या जातात. मात्र, गवताचे प्रमाण अधिक असलेल्या डोंगरावर या उपाययोजना कमी पडत आहेत. उंचकडे असलेले अनेक डोंगर आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मदतीने वणवे रोखण्यावर मर्यादा येत आहेत. वणवे रोखण्यासाठी संबंधित ग्रामपंचायती, शाळा आदी ठिकाणी जनजागृतीही करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी वणवा लावणाऱ्या काही युवकांवर कारवाईही करण्यात आली आहे. वणवे रोखण्यासाठी वन खात्याला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी केले आहे. 

वनसंपदेचे नुकनास टळले 
येथील काही निसर्गप्रेमींनी वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या मागील बाजूच्या डोंगराला लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. वनकर्मचारी सुनीता शिरसाट, श्रीमती गोरे, विशाल शिंदे, अतुल वाघवले, अक्षय औताडे, किरण चिमटे व परिसरातील काही ग्रामस्थांनी एका बाजूचा वणवा विझविण्यात यश आल्याने काही प्रमाणात वनसंपदेचे नुकसान टळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com