उड्डाणपूलाचे काम रखडल्याने हडपसर येथे तिरडी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्ता, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीक यांच्यावतीने यशरविपार्क ते ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग दरम्यान ही अंत्ययात्रा काढली.

हडपसर - ससाणेनगर रेल्वे भुयारी मार्ग व उड्डाणपूलाचे काम रखडल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुलाच्या शवाची प्रेत यात्रा काढून त्याला अग्नी देण्यात आला. फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्ता, काळेपडळ व ससाणेनगर मधील हौसिंग सोसायट्या व नागरीक यांच्यावतीने यशरविपार्क ते ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग दरम्यान ही अंत्ययात्रा काढली. ससाणेनगर रेल्वे भुयारी मार्गाचे व पुलाचे भूमिपूजन होऊन सुद्धा पुलाचे काम होत नसल्याने व रेल्वे गेट मोठं करून सुद्धा वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेचा विरोधात व सत्ताधा-यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

वेळोवेळी निवेदने देवूनही ढिम्म महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निवेदन शिष्टमंडळात फोष चे अध्यक्ष वैभव माने, विकास रैना, रशिद अत्तार, महेश पवार, अपेक्षा केळकर, प्रियंका शर्मा, रमजान शेख, मोहन गिनेलू, राजेश सोनाळेकर, रूशिकेष निसाळ, मनिष डेंगळे, सोनल पंधी, सोनल लाडे, निलीमा मूनोत व परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड, शिवप्रहार संघटना, सहजिवन जेष्ठ नागरिक मंच व मराठवाडा प्रतिष्ठान यांनी वैभव माने व फोष च्या मोर्चाला लेखी पाठिंबा दिला व पुढील प्रत्येक मोर्चाला सोबत राहणार असे जाहीर केले. मोर्चाचा शेवट तिरडीला व प्रतिकात्मक पूलाच्या शवाला अग्नी देऊन करण्यात आला

वैभव माने म्हणाले, नागरिक टॅक्स भरतात, त्यांना चांगल्या सेवा-सुविधा पालिकेने दयायला हव्यात हे पालीकेचे प्रथम कर्तव्य आहे. ब-याच वेळेस भूमिपूजन होऊन सुद्धा रेल्वे क्रॉसिंग येथील पूलाचे काम होत नसल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे व महापालिका व सत्ताधारी हे हातावर हात ठेवून बसले आहेत. जसे काही नागरिकांच्या अडचणींशी यांचा काहीएक संबंध नाही असाच आव आणत आहेत.

विशेष प्रकल्पचे विकार्यकारी अभियंता प्रसन्न जोशी व विजय दाभाडे यांनी लेखी निवेदन स्विकारले व कार्यवाही करू असे आश्वासन मोर्चातील नागरिकांना दिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Due to flyover work agitation was organized at Hadapsar