ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे वाकडमध्ये विजसेवा ठप्प 

wakad
wakad

पिंपरी : ऐन पावसाळ्यात आणि पावसाच्या तोंडावर वाकड परिसरात महापालिका ठेकेदारांकडून बेजबाबदारपणे सुरू असलेल्या कामांमुळे विजसेवा ठप्प होऊन असंख्य उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाकडून वाकड परिसरातील काही भागात स्ट्रॉम बॉटर आणि ड्रेनेज लाईनचे कामे सुरू आहेत, त्यामुळे अनेक ठीकाणी रस्ते खोदताना अनेक केबल तुटून विजसेवा विस्कळीत होत आहे. महापालिका ठेकेदार महावितरणला कुठलीही पूर्व कल्पना न देता तसेच समन्वयाचा योग्य अभाव असल्याने वारंवार भुमिगत वीज केबल तुटून ही समस्या उदभवत आहे
 
वाकड परिसरातील दररोज किमान २० सोसायटीची दिवसातून तीन ते चार तास वीज गुल होत असून सोसायटीधारक त्रस्त आहेत. अलीकडेच वीज समस्येमुळे वाकड स्मशानभूमीत अंत्यविधी देखील मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात करण्याची नामुष्की स्थानिक ग्रामस्थांवर ओढावली होती. १५ मे पासून आजपर्यंत दिडशेहून अधिक तास वीज गेली आहे. प्रत्येक सोसायटीला विजेसाठी जनरेटरचा आधार घ्यावा लागतो आहे. या जनरेटरला प्रती तास सुमारे ८ लिटर डिझेल जाळावे लागत आहे. त्यामुळे एकीकडे वर्षाकाठी लाखो रुपयांचे डिझेल खर्ची होत आहे तर, दुसरीकडे या जनरेटरच्या अतिरिक्त वापरामुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडत असून ही बाब अतिशय हनिकारक आहे.
         
ठेकेदारांच्या बेजबाबदार काराभरामुळे त्यांच्या चुकांमुळे नैसर्गिक संसाधनांचा देखील अपव्यय होत आहे. त्यापैकीच एक निखिल बांधकाम कंपनी आहे, जे वाकडच्या सभोवतालच्या परिसरात ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करत आहेत. आणि या सर्व समस्येला सर्वस्वी तेच जबाबदर असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पिंक सिटी रोड, शिवाजी चौक ते पिझ्झा हट पर्यंत, प्रीस्टिन प्रो-लाइफच्या परिसरात. सुमारे २ आठवड्यांपूर्वी यमुना नगरच्या आवारात ही केबल तुटीची घटना घडली होती, त्यामुळे त्या परिसरातील सोसायटींना व रहिवाशांना ३६ तासांपेक्षा जास्त वेळ अंधारात राहावे लागले या सर्वांचा एमएसईडीसीएलच्या कर्मचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यावर देखील कामाचा ताण येत आहे. 

 नुकतीच शाळेजवळ असलेल्या युरो केबल्समधून आद्रता निर्माण झाल्याने त्या परिसरात सुमारे ८ ते १० तासांपर्यंत बत्ती गुल आहे. या ठिकाणी ५० मीटर अंतरात सुमारे १० ते १५ ठिकाणी केबल तुटली होती मात्र ती त्वरित जोडण्यात आली.

''वीज गायब होण्याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहेत. या ठेकेदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून त्यांचा सल्ला घेऊन खोदकाम केले तर ही समस्या निर्माण होणार नाही. नागरिकांना देखील झगडावे लागणार नाही त्यांचे पैसे वाचतील.''
- किरण वडगामा, अध्यक्ष,  पलास सोसायटी

''माझ्या चुलत्याचे मागील आठवड्यात निधन झाले. लाईट अभावी तसेच सर्व रस्ते ऐन पावसाळ्यात खोदून ठेवल्याने आमची अत्यंत दयनीय अवस्था झाली अक्षरशः चिखल घाणीतून वाट काढत अंत्यविधी करावा लागला. मृत देहाला मरणानंतरही एवढ्या यातना सहन कराव्या लागत असतील तर वाकड मध्ये जन्मल्याबाबत मला खेद वाटतो''
- विक्रम विनोदे, स्थानिक रहिवाशी

''आमच्याकडे मनुष्यबळ कमी असताना देखील लोकांना कमीत कमी समस्येचा सामना करावा लागेल याची काळजी आम्ही घेतो मात्र महापालिकेच्या कामा दरम्यान अनेकदा केबल तुटून ही समस्या उदभवते. काही ठिकाणी आद्रता निर्माण झाल्याने वीज जाते.'' - सनी टोपे, सहायक अभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com