मुलभूत सुविधांच्या अभावाने आंदर मावळ अन् नाणे मावळातील नागरिक त्रस्त

vadgav_budruk.jpg
vadgav_budruk.jpg

टाकवे बुद्रुक : आंदर मावळ व नाणे मावळातील सह्याद्रीच्या कडेपठारावर वसलेली धनगर बांधवांची लोकवस्ती मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरीही या वाड्या वस्त्या अंधारातच आहे. ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या वस्तीशाळा हेच येथील विकास काम.

नाणे मावळच्या डोंगरावर नाणे पठार, करंजगाव पठार, पाले पठार, उकसान पठार, शिरदे पठार तर आंदर मावळाच्या डोंगरावर कुसवली, बोरवली, कांबरे, कुसुर पठार आहे. मुलभूत सुविधा नसल्याने रोजगारासाठी आणि मुलांच्या पुढील शिक्षणासाठी येथील तरूण पिढीने घरदार सोडून शहराचा रस्ता धरला. येथील शंभरहून अधिक दांपत्य शहरात मिळेल तेथे आसरा घेऊन राहत आहेत. 

रस्ता, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य या येथील मुख्य समस्या आहे. हंडाभर पाण्यासाठी तास-तासभर पाणवठ्यावर ताटकळत बसावे लागत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत उन्हाळ्यात आटून गेले. मान्सून देखील पडता पडत नाही. पठारावरील समस्या सोडविण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा तसेच सामाजिक संस्थांनी अधिक मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी नामदेव शेडगे, संदीप शेडगे, बाळू हिरवे, पांडुरंग ठिकडे, राजू ठिकडे, रामभाऊ आखाडे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे यांनी केली आहे. 

पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी टाटा पाॅवर, देवराई, मावळ विचार मंच, मावळ प्रबोधिनी या सामाजिक संस्थांनी मदत केली. पाणी साठवण करण्यासाठी शिवकालीन तलाव खोदले पण, हे प्रयत्न आता तोकडे पडू लागले आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वेगवेगळ्या कारणांनी कमी झाले आहे, त्यामुळे येथील पाणीटंचाईची समस्या वाढली आहे. पठारावरील पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त तशीच परिस्थिती डोंगरवाडीत देखील आहे.

शासकीय दाखले, रेशनिंगचे धान्य आणि दवाखान्यात जायला दहा किलोमीटर पायपीट करीत या मंडळींनी खाली यावे लागते. त्यातच पठारावर विखुरलेल्या लोकवस्त्या डाहूली, वडेश्वर, करंजगाव, उकसान शिरदे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. त्याचा स्थानिक विकासावर परिणाम होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण पठाराच्या विकासासाठी पठारावरील सर्व वाड्या वस्त्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी याही मागणीने जोर धरला आहे.

मोरमारवाडी, डोंगरवाडी सटवाईवाडी या पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे काम डोंगरवाडीच्या पुढे थांबले आहे, या रस्त्याचा फायदा स्थानिकांना कमी आणि धनिकांना ज्यादा होणार आहे. पठारावरील शेकडो एकर जमीन केव्हाच हडप झाली आहे. धनगर बांधवांना पायवाटेने जावे लागणार आहे. पठारावरील बहुतेक धनगर मंडळी कुसवली, पाले, करंजगावात पायपीट करीत निसरड्या पाऊल वाटेने जीव मुठीत धरून डोक्यावर दुधाचे कॅन घेऊन उतरत आहे.

आमदार बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मागील वर्षी करंजगाव पठारापर्यंत विजेची सोय उपलब्ध झाली आहे पण, पुढील गावांमध्ये वीज पुरवठा करण्याचे काम अद्याप बाकी आहे.

विठ्ठल शेडगे(दुग्ध व्यावसायिक )म्हणाले, " नाणे पठार ते कुसुर पठारापर्यंत आठ धनगर वाड्या आहे. आठही वाड्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमध्ये विभागल्या आहे, त्यामुळे येथील वाड्यांचा विकास खुंटला आहे. प्राथिमक शिक्षण सुविधा सोडली तर, कुठलीच सुविधा नाही. रस्ता हे एक दळणवळणाचे मोठे साधन असून त्याही सुविधेपासून हा भाग वंचित राहिला आहे. तसेच मूळ रस्त्यापासून पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागते. वयोवृद्ध, लहान मूल, गरोदर महिला, विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक यांना मोठी कसरत करावी लागते. पावसात निसरड्या पाऊल; वाटेने पायी कसरत चालावे लागते.

नामदेव शेडगे म्हणाले, "शिवकालीन पाण्याच्या टाक्या विहीरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते. मारुती ठिकडे म्हणाले, "चौथी पर्यंत मुले वस्तीशाळेत शिकली मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी आणि आमच्या रोजगार व मुलभूत सुविधेसाठी आम्ही बोरवली पठार सोडून सोमाटणेत राहू लागलो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com