प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच लावणी अमेरिकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

कर्ज दिले जात नाही
कलावंतांना बॅंकांमध्ये कर्ज दिले जात नाही. त्यामुळे मला सुवर्णयुग बॅंकेतून कर्ज घेऊन गाडी घ्यावी लागली होती. राज्य सरकारने यावर काहीतरी निर्णय घ्यावा, अशी खंत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘‘आर्थिक परिस्थितीमुळे चित्रपटांमध्ये जास्त काम मिळाले नाही. मात्र, सात हजार प्रयोगांमधील चार हजार प्रयोगांचा ‘हाउसफुल’चा फलक हटला नाही. प्रेक्षकांचे प्रेम कायम राहिल्यामुळेच मी अमेरिकेत लावणी सादर करू शकले. या पुरस्कारामुळे माझ्या संघर्षाचे, कष्टाचे सार्थक झाले,’’ अशी भावना नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांनी रविवारी व्यक्त केली.

श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे प्रियांकाजी महिला उद्योग संस्था आणि वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने यंदाचा ‘स्वर्गीय राजीव गांधी कलागौरव’ पुरस्कार पुणेकर यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, २१ हजार रोख, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी संयोजक संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे, डॉ. सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, काका धर्मावत आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणेकर म्हणाल्या, ‘‘नारायणगाव, शिवाजी मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर ते अमेरिकेतील मॅडिसन चौक हा संघर्षपूर्ण प्रवास होता. यामध्ये अनेक चांगले-वाईट दिवस आले; पण प्रेक्षकांनी माझ्या कलेला भरभरून दाद दिली. देऊळ, शाळा, कलावंतांच्या मुला-मुलींसाठी लावणीचे प्रयोग केले. हा पुरस्कार माझा नसून लोककलावंतांचा आहे.’’

पवार म्हणाले, ‘‘लावणीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना साथ देणारी एकमेव कलावंत, लावणीच्या शब्दांना मुद्राभिनय आणि खड्या आवाजात पोचवणाऱ्या सुरेखा पुणेकरांना हा पुरस्कार देणे हे माझे भाग्यच आहे.’’ या वेळी संजय बालगुडे यांनी प्रास्ताविक, तर संजीवनी बालगुडे यांनी आभार मानले.

Web Title: Due to the love of the audience, Lavani is in America