पादचारी उड्डाण पुलांमुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा

संतोष शाळिग्राम 
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे  - ""एका भरधाव वाहनाने मला अधू केले. माझ्या वाट्याला आलेल्या या वेदना कुणाच्या नशिबी येऊ नयेत. नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी उड्डाण पूल होतोय, याचे समाधान आहे. आता किमान विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील धास्ती तरी दूर होईल.... 

पुणे  - ""एका भरधाव वाहनाने मला अधू केले. माझ्या वाट्याला आलेल्या या वेदना कुणाच्या नशिबी येऊ नयेत. नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी उड्डाण पूल होतोय, याचे समाधान आहे. आता किमान विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील धास्ती तरी दूर होईल.... 

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या न्यू मोदीखाना परिसरात राहणाऱ्या शोभा श्‍याम यादव यांची ही भावना बरंच काही सांगून जाते. अडीच वर्षांपूर्वी मुलांना शाळेत सोडून येताना कॅस्टेलिना स्ट्रीट परिसरात एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती. कॅस्टेलिना रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पुलावर पादचारी उड्डाण पूल उभारण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना त्या अपघाताची आठवण झाली. या भागातील भरधाव वाहनांमुळे जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे नागरिक आणि विद्यार्थी यांच्या मनात असलेली अपघाताची भीती संपेल, असे समाधान त्यांनी व्यक्त केले. 

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या इमारतीबाहेरील जगन्नाथ शंकरशेठ रस्त्यावरून कॅस्टेलिना रस्त्याकडे वळल्यानंतर पुढे कॅनॉलवर ब्रिटिशकालीन पूल आहे. त्याच्या उजव्या बाजूस सोलापूर बाजार, उत्कर्ष आणि सेंट अँथोनी शाळा, तर उजव्या बाजूला न्यू मोदीखाना आणि आझम कॅंपसचा शैक्षणिक परिसर आहे. या पुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या पुलावर न्यू मोदीखाना ते सोलापूर बाजार यादरम्यान कॅंटोन्मेंट बोर्डाने पादचारी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. 

"कॅंटोन्मेंट'समोरही पूल 

स्वारगेटपासून हडपसरकडे जाणाऱ्या जगन्नाथ शंकरशेठ रस्त्यावर कॅंटोन्मेंटचे "सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय' आहे. त्या बाहेर पीएमपीचा बसथांबा आहे. या रस्त्यावरून भरधाव वाहने जात असतात. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे असलेले कॅंटोन्मेंट बोर्ड, भविष्य निर्वाह निधीचे कार्यालय, स्टेट बॅंक या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते. हा त्रास टाळण्यासाठी रुग्णालयाच्या पदपथाला लागून पादचारी उड्डाण पूल होणार आहे. रुग्णालयाच्या पदपथावरून ते कॅंटोन्मेंटच्या इमारतीबाहेरील पदपथावर यामुळे सहजपणे ये-जा करता येईल. 

नगरसेवक, अधिकाऱ्यांचा प्रयत्न 

कॅस्टेलिना रस्ता परिसरात एका महिलेचा अपघात झाल्यानंतर अतुल गायकवाड, विवेक यादव, प्रियांका श्रीगिरी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी पुलासाठी पाठपुरावा केला होता. बोर्डाचे उपकार्यकरी अभियंता म्हणाले, ""कॅस्टेलिना रस्त्यावरील पादचारी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल. परंतु, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाबाहेरील पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी जाईल. त्यानंतर दोन्ही पुलांमुळे नागरिकांना ये-जा करताना वाहतुकीचा त्रास होणार नाही.'' 

मुलांना शाळेत सोडून घरी येताना माझ्या पत्नीला अडीच वर्षांपूर्वी अपघात झाला होता. तिथे पादचारी उड्डाण पुलाची गरजच आहे. सोलापूर बाजार आणि न्यू मोदीखाना परिसरात अनेक शाळा आहेत. हा पूल तातडीने बांधला पाहिजे. यामुळे अपघाताचा धोका टळेल. विद्यार्थ्यांना आनंदाने शाळेत ये-जा करता येईल. 
- श्‍याम यादव (नागरिक, न्यू मोदीखाना परिसर) 

Web Title: Due to pedestrians flyovers students and parents are encouraged