"पॉस' मशिनमुळे थांबला धान्याचा काळाबाजार 

अनिल सावळे
रविवार, 24 जून 2018

"पॉस' मशिनमुळे धान्याची मोठी बचत होत आहे. हे शिल्लक धान्य नवीन लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरी भागात 2013 मध्ये 59 हजार रुपये वार्षिक उत्पन्नाच्या अटीनुसार पात्र असूनही बरेच केशरी कार्डधारक लाभार्थी धान्यापासून वंचित होते. त्या लाभार्थ्यांना हे धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. 
- रघुनाथ पोटे, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर 

पुणे : स्वस्त धान्य दुकानांमध्ये पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिनद्वारे धान्य वितरण सुरू केल्यानंतर धान्य विक्रीची नोंद थेट पुरवठा विभागाच्या कार्यालयात होत आहे. यामुळे शहरातील रेशनिंग दुकानदार आवश्‍यक तेवढेच धान्य घेत आहेत. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात गोदामांमध्ये तब्बल तीन हजार 312 टन धान्य शिल्लक राहिले. त्यामुळे यापूर्वी शेकडो टन धान्य नेमके कोठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शहरात "पॉस' मशिनचा वापर करण्यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत 343 टन आणि दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) केशरी शिधापत्रिकाधारकांना सहा हजार 864 टन धान्य वितरित करण्यात येत होते. त्या वेळी रेशन दुकानात एक किलोही धान्य शिल्लक राहत नव्हते. मात्र या वर्षी मे महिन्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 252 टन आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना तीन हजार 643 टन धान्य वितरित करण्यात आले. यामुळे सध्या दर महिन्याला तीन हजार 312 टन धान्य शिल्लक राहत असल्याचे समोर आले आहे. 

वितरित धान्य 
एप्रिल 2017 
अंत्योदय योजना : 343 टन 
बीपीएल आणि केशरी कार्डधारक : 6 हजार 864 टन 

मे 2018 
अंत्योदय योजना : 252 टन 
बीपीएल आणि केशरी शिधापत्रिकाधारक : 3 हजार 643 टन 

धान्याची बचत (दरमहा) 
3 हजार 312 टन 

शहरातील स्वस्त धान्य दुकाने - 890 
"पॉस' मशिनची संख्या - 879 

शहरातील शिधापत्रिकाधारक (मे 2018) 
एकूण शिधापत्रिकाधारक - 9 लाख 81 हजार 783 
पिवळी - बीपीएल 24 हजार 382, अंत्योदय 9 हजार 977 
केशरी - 3 लाख 30 हजार 875 
विनाधान्य केशरी - 4 लाख 57 हजार 927 
शुभ्र - एक लाख 58 हजार 509 
अन्नपूर्णा - 113
 

Web Title: Due to Poss machine stopped black market