होर्डिंग पडल्याने कवडीपाट टोलनाका परिसरात वीजपुरवठा खंडित

जनार्दन दांडगे 
गुरुवार, 7 जून 2018

लोणी काळभोर - पूर्व हवेलीमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावच्या परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच पुणे-सोलापूर महामार्गालगतची होर्डिंग तुटून कवडीपाट टोलनाका परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

लोणी काळभोर - पूर्व हवेलीमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावच्या परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच पुणे-सोलापूर महामार्गालगतची होर्डिंग तुटून कवडीपाट टोलनाका परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

बुधवारी (ता. ६) सायंकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत या भागात वादळी पाऊस सुरु होता. या पावसामुळे कदमवाकवस्ती येथील निजाम खानापुरे, महादेव पाचपिंडे, संतोष सोनवणे, प्रकाश जोगदंड, महावीर पटेकर यांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. कवडीपाट येथील कुमार मंडपच्या कार्यालयावर व टोलनाका येथील जगदंबा हॉटेल येथील दोन्ही होर्डिंग तुटल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण कडून गुरुवारी (ता. ७) दिवसभर तुटलेल्या वीजवाहक तारांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.   

वादळी पावसामुळे विजेचा लपंडाव 
पूर्व हवेलीमध्ये थेऊर उपकेंद्रामार्फत कोरेगाव मुळ व वळती फिडरद्वारे वीजपुरवठा केला जातो. यातील वळती फिडरवरून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर वीजपुरवठा केला जातो. मात्र मागील  दोन दिवसांपासून या भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणच्या रोहीत्रांची व वीज वाहक तारांची दुरुस्ती केल्याची माहिती महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागामार्फत देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात वळती फिडरमध्ये होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे या भागातील नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. 

Web Title: due to rain electricity Power supply breaks