पुणे : साडेसात किलोमीटर प्रावासासाठी अडीच तास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कासारवाडी ते खडकी दरम्यान दापोडीजवळ असलेल्या हॅरीस पूल आणि त्याच्या लगत उभारलेल्या नवीन दोन पुलांवर तर अभूतपूर्व कोंडी झाली होती.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पूरपरिस्थितीमुळे अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करावे लागले आहेत. याचा शहरातील वाहतुकीवर सोमवारी मोठा परिणाम झाला. अत्यंत संथ आणि बेशिस्त वाहतुकीचा फटका लोकांना बसला. कोंडीमुळे कासारवाडी ते खडकी हे साडेसात किलोमीटरचे हे अंतर पार करण्यास लोकांना दीड तासांचा अवधी लागत होता. 

पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणारे औंध, सांगवी येथील पूल बंद केल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला होता. त्यामुळे कासारवाडी ते खडकी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कासारवाडी ते खडकी दरम्यान दापोडीजवळ असलेल्या हॅरीस पूल आणि त्याच्या लगत उभारलेल्या नवीन दोन पुलांवर तर अभूतपूर्व कोंडी झाली होती.

कोसळणारा पाऊस आणि त्यातच आपले वाहन पुढे दामटण्याच्या प्रयत्नामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होते. दुपारी साडेचारच्या सुमारास कासारवाडी येथून निघालेल्या लोकांना खडकीपर्यंत जाण्यास सहा सव्वासहा वाजले. पिंपरी-चिंचवडहून रुग्णाला घेऊन पुण्याकडे रुग्णालयात निघालेल्या रुग्णवाहिकेला या कोंडीतून वाट काढताना चालकाची दमछाक झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to traffic jam two and half hour for seven and half kilometers