दुबार मतदारांना बसणार आळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

पुणे - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकाच दिवशी (ता. २१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. त्यामुळे मतदार यादीत दुबार नोंद असलेल्यांना तसेच बोगस मतदान करणाऱ्यांना आळा बसणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद हद्दीवर असणाऱ्या प्रभागातील गैरप्रकार यामुळे थांबणार आहेत.

पुणे - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकाच दिवशी (ता. २१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. त्यामुळे मतदार यादीत दुबार नोंद असलेल्यांना तसेच बोगस मतदान करणाऱ्यांना आळा बसणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद हद्दीवर असणाऱ्या प्रभागातील गैरप्रकार यामुळे थांबणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी पुण्याबाहेरच्या मतदारांची नोंदणी करून त्यांच्याकडून मतदान करवून घेतल्याच्या तक्रारी गेल्या महापालिका निवडणुकीत झाल्या होत्या. काही उमेदवार मतदार नोंदणीच्या वेळीच अशा प्रकारची नोंदणी करतात आणि परगावच्या मतदारांना निवडणूक काळात पुण्यात आणतात, अशीही तक्रार केली होती. यंदा निवडणूक आयोगाने एकट्या पुणे जिल्ह्यातील सव्वा लाखांपेक्षा जास्त दुबार नावे वगळली आहेत. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेची निवडणूक एकाच दिवशी आल्याने हक्काचे गावातील मत सोडून महापालिकेसाठी मतदान करण्याचा बेकायदेशीर मार्ग कोणी अवलंबेल, अशी शक्‍यता नाही.

मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आदी तालुक्‍यांचा भाग शिवणे, वारजे, कोथरूड, धनकवडी, आंबेगाव, तसेच सिंहगड रस्ता, खराडी, चंदननगर, हडपसर, कोंढवा, येवलेवाडीपर्यंत येतो. त्यामुळे या परिसरात एकाच दिवशी महापालिका आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. शहराची भौगोलिक रचना लक्षात घेतली, तर शहरालगतच्या भागातून व्यवसाय, नोकरी, उद्योग, शिक्षण आदी कारणांसाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांची शहरातही घरे आहेत. परिणामी अनेक मतदारांची शहरातील मतदार याद्यांत आणि जिल्हा परिषदेच्या मतदार याद्यांतही नोंदणी झालेली आहे.

यापूर्वीच्या निवडणुकांत शहरात किंवा जिल्हा परिषदेसाठी दोन्हीकडे राहणाऱ्या काही नागरिकांनी मतदान केल्याचे उघडकीस आले आहे. निवडणूक आयोगाची शाई पुसण्यासाठी काही विशिष्ट रसायनांचा वापर केला जात असे; परंतु आता एकाच दिवशी निवडणूक आल्यामुळे त्याला अटकाव होणार आहे.

एरवी पुण्यातील कार्यकर्त्यांची कुमक जिल्ह्यात प्रचारासाठी, तर जिल्ह्यातील कुमक प्रचारासाठी पुण्यात येत असे. आता त्यालाही मर्यादा येणार आहेत. निवडणूक आयोगाचेही यंदा दुबार मतदारांवर कडक लक्ष राहणार आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी नाव ठेवण्याचा चालाखपणा कोणी केला तरी त्यांना एकाच ठिकाणी मतदान करणे भाग पडणार आहे.

दुबार नोंदणीबाबत खरे तर निवडणूक आयोगानेच योग्य वेळी काळजी घ्यायला हवी होती. दोन्ही ठिकाणी कोणी मतदान करणार नाही, याची दक्षता सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनीही याबाबत जागृत राहायला हवे.
- अप्पा रेणुसे, प्रदेश प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस

अनेक उपनगरांत दुबार नोंदणी झाली आहे. काहींनी हेतुतः जिल्ह्यातील मतदारांची शहरातही नोंदणी केल्याचे उघड झाले आहे. त्याला एकाच दिवशी दोन्हीकडे मतदान करण्याच्या निर्णयामुळे अटकाव होईल. तसेच मतदान कोठे करायचे, याबाबत मतदारांना पर्यायही उपलब्ध होणार आहे. दुबार मतदान टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय उपयुक्त आहे.
- गोपाळ चिंतल, भाजपचे बूथ विभागप्रमुख

Web Title: duplicate voters