तळेगावात धूळमुक्तीची चळवळ

गणेश बोरुडे
गुरुवार, 21 जून 2018

तळेगाव स्टेशन (पुणे) - उपनगरांमधील रहिवाशांकडून अंतर्गत रहदारीचा रस्ता आणि घर यामधील मोकळ्या जागेवर वैयक्तिक खर्चातून सिमेंटचा कोबा केल्यामुळे धुळीला आपसूकच पायबंद घातला बसत आहे. पर्यावरणाविषयी जागरुक तळेगाव दाभाडे शहरात धुळीला पायबंद घालणारी चळवळ चांगलीच जोर धरत आहे.

तळेगाव स्टेशन (पुणे) - उपनगरांमधील रहिवाशांकडून अंतर्गत रहदारीचा रस्ता आणि घर यामधील मोकळ्या जागेवर वैयक्तिक खर्चातून सिमेंटचा कोबा केल्यामुळे धुळीला आपसूकच पायबंद घातला बसत आहे. पर्यावरणाविषयी जागरुक तळेगाव दाभाडे शहरात धुळीला पायबंद घालणारी चळवळ चांगलीच जोर धरत आहे.

तळेगावची नैसर्गिक ठेवण आणि इथली स्वच्छ, सुंदर, निर्भेळ हवा कधीकाळी अस्थमा रुग्णांसाठी पोषक ठरली. अलीकडे इथल्या बहरलेल्या हिरवाईला शहरीकरणाचे ग्रहण लागले असले तरी, सामान्य नागरिकांमध्ये असलेली आरोग्य आणि पर्यावरणाबाबतची जागरुकता मात्र तसूभरही कमी होताना दिसत नाही. याच मानसिकतेतून तळेगाव स्टेशनच्या आनंद वनश्रीनगरमधल्या बहुतांशी रहिवाशांच्या वैयक्तिक पुढाकारातून धूळमुक्तीलाठी प्रयत्न करत आहेत. तळेगाव-चाकण महामार्गाला समांतर वसलेल्या आनंदनगरमधील अंतर्गत रस्त्यांवरून फिरताना रस्ता आणि रहिवाशी इमारती अथवा घरांच्या मधली जागा तुरळक ठिकाणीच उघडी दिसते. 

पायऱ्या, गेट, कंपाउंड पासून थेट रहदारीच्या रस्त्यापर्यंतची जागा वैयक्तिक खर्चातून सिमेंटचा कोबा अथवा हिरवळीने आच्छादलेली आपल्याला दिसते. काहींनी घरासमोरील सार्वजनिक मोकळया जागेत स्वखर्चातून झाडे लावून ती जोपासली देखील आहेत. पाणी मुरण्यासाठी किंचित जागा सोडली तर अगदी रस्त्याकडेच्या झाडांच्या बुंध्यापर्यंत भूभाग आच्छादित करण्यात आलेला दृष्टीस पडतो. यामुळे अंगणाला नीटनेटकेपणा येण्याबरोबरच पावसाळ्यात चिखल आणि इतर वेळी धुळीला पायबंद बसला आहे. रस्त्यावरुन वाहने जाताना उडणारी धूळ डोळ्यांना दिसत नसली तरी,पूर्वीची घरातील वस्तूंवर जमा होणारी प्रचंड धूळ मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचा नागरिकांचा दावा आहे. याबरोबरच अप्रत्यक्षपणे श्वसनाद्वारे नाकातोंडात जाणारी धूळही निश्चितच कमी झाली असणार यात शंका नाही. एकंदरीतच पर्यावरण पूरक, वैयक्तिक घर आणि शहराची टापटीप वाढविणारी आणि आरोग्यदृष्ट्या हितकारक धूळमुक्तीच्या चळवळीने तळेगावात चांगलाच जोर धरला आहे. 

आनंद वनश्रीनगरमध्ये तर जणू धूळमुक्तीचं...तुफान आलंया. आता तळेगाव दाभाडे पालिका प्रशासनाने धूळमुक्तीसाठी जनजागृती मोहिमा राबवून धूळमुक्तीला चालना देण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणच्या धूळ उत्पत्तीच्या जागा पालिकेने तसेच नागरिकांनी निदान आपले घर आणि रस्त्यासमोरील जागा सिमेंट अथवा हिरवळीने आच्छादित केल्यास, आनंद वनश्रीनगर पहिले धूळमुक्त उपनगर होण्याबरोबरच पालिका स्थरावरील पहिले डस्ट फ्री सिटी अर्थात धूळमुक्त शहर बनण्याचा मान तळेगावला मिळण्यास निश्चितच वाव आहे.

"प्रगत राष्ट्रांत धूळमुक्तीसाठी स्थानिक प्रशासनाच्या मूलभूत योजना आहेत.नागरिक आणि प्रशासन एकत्रित आल्यास धूळमुक्ती अशक्यप्राय काम नाही.आपल्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे धूळमुक्तीसाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न हवेत."
- नंदकुमार वडके (नागरिक-आनंद-वनश्रीनगर)

"आरोग्य आणि पर्यावरणदृट्या अत्यावश्यक धुळमुक्तीच्या चळवळीला गती देण्यासाठी नागरिकांनी स्वंस्फुर्तीने आपापल्या घर अथवा सोसायटी समोरील मातीयुक्त भागाचे काॅन्क्रीटीकरण करुन घ्यावे."
-सुलोचना आवारे (स्थानिक नगरसेविका)

Web Title: Dust-free movement in Talegaon