पुणे शहरात धावणार इलेट्रॉनिक रिक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये येत्या वर्षात १० हजार ई-रिक्षा धावणार आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशनसह पायाभूत सुविधा तयार करण्यावर संबंधितांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पेट्रोल आणि सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षांच्या तुलनेत ई-रिक्षा प्रवासी भाड्यातही प्रवाशांना किफायतशीर ठरतील, असा दावा यासाठी पुढाकार घेणाऱ्या कॅब क्षेत्रातील ओला कंपनीने केला आहे. 

या कंपनीने मिशन इलेट्रिकअंतर्गत तीन शहरांत येत्या वर्षात १० हजार रिक्षा आणण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील तीन शहरांशिवाय देशातील अन्य राज्यांतही कंपनीने ई-रिक्षांबाबत चर्चा सुरू केली आहे. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ई-रिक्षा उपयुक्त ठरत असल्यामुळे कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी दिली.

रिक्षावर उपजीविका अवलंबून असलेला राज्यात मोठा कष्टकरी वर्ग आहे. त्यांना मिशन इलेट्रिकमध्ये भागीदार म्हणून सामावून घेण्यात येणार आहे. त्यातून त्यांचे राहणीमान आणि जीवनमानही उंचावेल, असे अग्रवाल यांनी नमूद केले. पुणे आणि नाशिकमध्ये ई-रिक्षांचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार आहे. 

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओलाने गेल्या वर्षी २६ मे रोजी ई-वाहनांचा वापर सुरू केला आहे. त्यात ई-कॅब, रिक्षा, इलेट्रिक बस, रूफटॉप सोलर, चार्जिंग स्टेशन्स, बॅटरी स्वॅपिंग आदींचा समावेश आहे. ओलाची सध्या २०० ई-वाहने धावत आहेत. त्यांनी सुमारे ४० लाख किलोमीटर प्रवासाचा टप्पा पार केला आहे. नागपूरमध्ये रिक्षाचालक घरातही बॅटरी चार्ज करू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे सोयीचे झाले आहे. पुण्यातही ई-रिक्षांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सुरू झाली आहे. शहरात सध्या सुमारे १५०० ई-वाहने आहेत, असे आरटीओच्या सूत्रांनी सांगितले.

पुण्यातील रिक्षांची संख्या - सुमारे ६० हजार
ओलाशी संलग्न रिक्षा - अंदाजे ८ हजार 

जवळच्या अंतरासाठी रिक्षाचालक येत नाहीत; परंतु कॅब कंपनीचे रिक्षाचालक मात्र सेवा नाकारत नाहीत. वाहनांतील धुरामुळे सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यावर ई-रिक्षा हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करायला हवे. 
- अर्चना शहाणे, प्रवासी

Web Title: e-rickshaw in pune