शहरात ई-कचऱ्याचा ज्वलंत प्रश्‍न; महापालिकेकडे यंत्रणेचा अभाव

दीपेश सुराणा
बुधवार, 16 मे 2018

पिंपरी - शहरामध्ये सध्या ई-कचऱ्याचा ज्वलंत प्रश्‍न निर्माण झाला आहे. संबंधित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे निर्माण होणारा ई-कचरा एक तर भंगारात जातो किंवा सामान्य कचऱ्यात मिसळला जातो. पर्यावरण संवर्धन समितीने (ईसीए) यासाठी पुढाकार घेऊन त्यावर मोफत प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे त्यांना भोसरी स्थानांतरण केंद्राशेजारी जागा दिली जाणार आहे. 

जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची आणि तातडीने तोडगा काढण्याची गरज असलेली समस्या म्हणजे ई-कचरा होय. ई-कचऱ्याची तीन टप्प्यांमध्ये विल्हेवाट लावली जाते. वस्तूचा वापर कमी करणे, त्याचा पुर्नवापर करणे किंवा वस्तू पुन्हा वापरात आणण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करणे (रिसायकल) अशा तीन टप्प्यांचा त्यात समावेश आहे.

महापालिकेने ई-कचरा संकलनासाठी पर्यावरण संवर्धन समितीच्या मदतीने 17 डिसेंबर 2017 मध्ये प्रथमच मोहीम घेतली. त्या वेळी 2.55 टन ई-कचरा गोळा झाला. समितीतर्फे ई-कचरा गोळा करण्याचे काम सध्या टप्पानिहाय सुरू आहे.

महापालिकेकडे सध्या ई-कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नाही. पर्यावरण संवर्धन समितीने संबंधित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांना महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास ते ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहेत. भोसरी कचरा स्थानांतरण केंद्राशेजारी असलेली जागा त्यांना देण्याचे नियोजन आहे. 
- मनोज लोणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी 

महापालिकेने जागा आणि आवश्‍यक सुविधा दिल्यास शहरातील ई-कचऱ्यावर मोफत प्रक्रिया केली जाईल. नागरिकांपर्यंत पोचून त्यासाठी जनजागृती करण्यात येईल. नागरिकांकडून मिळणाऱ्या कचऱ्याचे धातू, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, इलेक्‍ट्रिक सामान, काच, प्लॅस्टिक, थर्माकोल असे वर्गीकरण केले जाईल. "टाकावूपासुन टिकाऊ' ही संकल्पना वापरून उपयोगी वस्तू तयार केल्या जातील. ज्या ई-कचऱ्याचा उपयोग करता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनमान्य रिसायकलरकडे दिले जाईल. 
- विकास पाटील, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए) 

ई-कचरा म्हणजे नेमके काय? 
|निरुपयोगी इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंपासून तयार झालेला कचरा म्हणजे ई-कचरा. कॉम्प्युटर्सचे मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, मोबाइलचे खराब झालेले सुटे भाग, बंद पडलेली इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, टेलिव्हिजन, इलेक्‍ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल यांचा त्यामध्ये समावेश होतो. 

Web Title: The e-waste was a burning question in the city