पुणे : लष्कराच्या कमांड रुग्णालयात ‘अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ची (ईआयसी) स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

early intervention center

देशात दरवर्षी जन्मलेल्या २ कोटी ७० लाख मुलांपैकी जवळपास १० टक्क्यांना आजार, दिव्यांगत्व किंवा शारीरिक विकासातील विलंबाच्या समस्या असतात.

पुणे : लष्कराच्या कमांड रुग्णालयात ‘अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ची (ईआयसी) स्थापना

पुणे - देशात दरवर्षी जन्मलेल्या २ कोटी ७० लाख मुलांपैकी जवळपास १० टक्क्यांना आजार, दिव्यांगत्व किंवा शारीरिक विकासातील विलंबाच्या समस्या असतात. ज्यामुळे भविष्यात त्यांना गंभीर समस्या उद्भवतात. या समस्यांचे वेळेत निदान झाल्यास वैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने यावर उपचार करणे शक्य आहे. याच अनुषंगाने पुण्यातील लष्कराच्या कमांड रुग्णालयात ‘अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ची (ईआयसी) स्थापना करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कमांड रुग्णालयात हे केंद्र उभारण्यात आले आहे. यामुळे आता लहान मुलांना असलेले आजार किंवा शारीरिक विकासातील समस्यांचे लवकर निदान करत त्यावर उपचार करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन नुकतेच आर्मी व्हाईव्स वेल्फेअर असोसिएशनच्या (एडब्ल्यूडब्ल्यूए) प्रादेशिक अध्यक्षा अनिता नैन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बालरोग विभागाचे प्रमुख कर्नल कार्तिक राम मोहन व इतर अधिकारी, एडब्ल्यूडब्ल्यूएतील सदस्या आदी उपस्थित होते.

लहान मुलांच्या दिव्यांगत्वाच्या विविध पैलूंवर काम करण्यासाठी तसेच त्यावर त्वरित उपचार देण्याकरिता केंद्रामध्ये अनेक तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अनेक थेरपिस्ट - क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, विशेष शिक्षक, पोषणतज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ आदींचा समावेश आहे.

यावेळी कर्नल मोहन म्हणाले, ‘‘कमांड रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलांची तपासणी प्राथमिक स्वरूपात केली जाईल. यामुळे त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे शारीरिक विकासातील कमतरता आढळून आल्यास त्यांचे नाव त्वरित या केंद्रात नोंदवले जाणार. तसेच त्यांना उपचार दिले जातील. दरम्यान जन्म ते वयाच्या सहा वर्षांपर्यंत अशा लहान मुलांना सर्वोत्तम उपचाराच्या सेवा पुरविण्यात येईल.’’

टॅग्स :puneindian armyHospital