बॅंकांसमोर पहाटेपासूनच रांगा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून रद्द केलेल्या नोटांचा भरणा करण्यासाठी आणि त्या नोटा बदलण्यासाठी शहरातील बॅंकांमध्ये पहाटेपासून भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी दरवाजे उघडताच बॅंकांमध्ये ग्राहकांची तुंबळ गर्दी उसळली. काही बॅंकांमधून पहिल्या तासातच शंभर-पन्नासच्या नोटा संपल्या. त्यामुळे बॅंकेतील कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात अक्षरशः वाद पेटले. प्रमुख बॅंकांच्या शाखांमध्ये कामकाज शांततेत होण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागल्याचे चित्र शहरात जागोजागी दिसत होते. 

पुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातून रद्द केलेल्या नोटांचा भरणा करण्यासाठी आणि त्या नोटा बदलण्यासाठी शहरातील बॅंकांमध्ये पहाटेपासून भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी दरवाजे उघडताच बॅंकांमध्ये ग्राहकांची तुंबळ गर्दी उसळली. काही बॅंकांमधून पहिल्या तासातच शंभर-पन्नासच्या नोटा संपल्या. त्यामुळे बॅंकेतील कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात अक्षरशः वाद पेटले. प्रमुख बॅंकांच्या शाखांमध्ये कामकाज शांततेत होण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागल्याचे चित्र शहरात जागोजागी दिसत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याचे जाहीर केले. त्यानंतर बुधवारी बॅंकांना सुट्टी जाहीर केली. तसेच, "एटीएम'देखील बंद ठेवण्यात आली. बॅंका आणि टपाल खाते यातून नागरिकांकडे असलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करून चार हजार रुपयांपर्यंत सुट्ट्या नोटा दिल्या जातील, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे या नोटा बदलण्यासाठी पुण्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंकांच्या शाखांमध्ये भल्या पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. 

याबाबत बोलताना सिंहगड रस्त्यावरील नीलिमा हिंगे म्हणाल्या, ""मला पाचशेच्या वीस नोटा देऊन शंभरच्या नोटा घ्यायच्या होत्या. त्यासाठी पहाटेपासून गर्दी असल्याचे समजले. बॅंक उघडल्यावर लगेच पैसे मिळतील म्हणून मी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभी होते. बॅंकेने पाचशेच्या नोटा जमा करून घेतल्या आणि त्या बदल्यात वीसच्या नोटांची बंडले दिली. त्यातील नोटा जीर्ण झालेल्या आहेत. बऱ्याच नोटा जुन्या आणि फाटक्‍या आहेत.'' 

मिळाले फक्त दोन हजार 
बहुतांश राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकांमधून चारऐवजी फक्त दोन हजार रुपये सुट्टे करून ग्राहकांना दिले जात असल्याची माहिती पुढे आली. एका नागरिकाला चार हजार रुपये सुटे मिळतील, असे सांगण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात बॅंकांनी ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दृश्‍य बहुतांश ठिकाणी दिसत होते. 

तासाभरातच शंभरच्या नोटा संपल्या 
काही बॅंकांमध्ये सकाळी अवघ्या एक तासाच्या व्यवहारानंतर शंभरच्या नोटा संपल्याचे सांगण्यात येत होते. मोठे ग्राहक, नियमित ग्राहक आणि व्यापारी यांना शंभरच्या नोटा देण्यास बॅंकांनी प्राधान्य दिल्याची टीका सामान्य पुणेकर नागरिकांनी केली. नोटा बदलण्यासाठी रांगांमध्ये ताटकळत उभे राहून पदरी निराशाच पडल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. 

आज रात्री बारापर्यंत वीज भरणा सुरू  वीज वितरण कंपनीने उद्या (ता. 11) रात्री बारा वाजेपर्यंत वीज बिल भरणा सुरू ठेवला आहे. यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणारआहेत. त्या वेळेनंतर मात्र या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे आदेश काढण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे कळविण्यात आली आहे. 

पैसे काढण्यापेक्षा भरण्यावर भर 
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात सुट्टे पैसे घेण्यापेक्षा या नोटा खात्यात भरण्यावर जास्त भर असल्याचे निरीक्षण विविध बॅंकांमधील अधिकाऱ्यांनी नोंदविले. याबाबत बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या नांदेड शाखेचे शाखाधिकारी गणेश कुलकर्णी म्हणाले, ""बॅंकेत सकाळपासून गर्दी होती. पण, त्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा भरणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा व्यवहार शांततेत आणि सुरक्षित पूर्ण होईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गोंधळ न होता दिवसाचे कामकाज पार पडले.'' 

बॅंकांच्या वेळा दोन तास वाढविल्या 
शहरातील बॅंकांच्या कामकाजाची वेळ गुरुवारी दोन तासांनी वाढविण्यात आली. सकाळपासूनच बॅंकांमध्ये गर्दी असल्याने ही वेळ वाढविण्यात आली. रोज संध्याकाळी पाच वाजता बंद होणाऱ्या बॅंका आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होत्या. या वेळेत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. 

आज काय होणार 
- बहुतांश बॅंकांच्या एटीएम सुविधा सुरू होतील 
- एटीएममध्ये शंभरच्या नोटा उपलब्ध असतील 
- काही बॅंकांच्या एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटाही ग्राहकांना मिळतील 
- बॅंकांमधून हजार-पाचशेच्या नोटा नियमित स्वीकारल्या जातील 

Web Title: early morning, queues in front of banks