‘कमवा-शिका’ला कलात्मक हातांची जोड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून रोमानियन कला प्रकारात मोडणाऱ्या वस्तू तयार केल्या आहेत. ‘थ्रेड स्टिंग आर्ट’ या हस्तकलेतून तयार होणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तू महाराष्ट्रात तशा अपरिचितच आहेत. मात्र, कमवा शिका योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील दोन महिन्यांमध्ये हा अभिनव प्रयोग विद्यापीठात सुरू केला आहे. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून रोमानियन कला प्रकारात मोडणाऱ्या वस्तू तयार केल्या आहेत. ‘थ्रेड स्टिंग आर्ट’ या हस्तकलेतून तयार होणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तू महाराष्ट्रात तशा अपरिचितच आहेत. मात्र, कमवा शिका योजनेंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील दोन महिन्यांमध्ये हा अभिनव प्रयोग विद्यापीठात सुरू केला आहे. 

धाग्यांच्या साह्याने भाव-भावना दाखवणारे पोट्रेट, साध्यातले-साधे गोल, त्रिकोण, चौकोन यांपासून ते मानवी चेहऱ्यांच्या हुबेहूब प्रतिकृती, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीची प्रतिकृती, कलात्मक असे विविध आकार या कलाकुसरीतून साकारले आहेत. 

राहुल ठाकरे या विद्यार्थ्यास ‘थ्रेड स्टिंग आर्ट’ या कलाप्रकाराबद्दल माहिती होती. विद्यापीठातील कमवा शिका या विद्यार्थी विकास मंडळाच्या योजनेत काम करत असताना त्याने मंडळाचे प्रमुख प्रा. प्रभाकर देसाई यांच्या परवानगीने दोन महिन्यांपूर्वी या वस्तू बनवण्यास सुरवात केली. सुरवातीस त्याने या योजनेतील विद्यार्थ्यांना रोमानियन हस्तकलेतून कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले. मागील दोन महिन्यांत जवळपास ४० विद्यार्थी या कलाप्रकारात पारंगत झाले आहेत. त्यांनी जवळपास दोनशे कलाकृती निर्माण केल्या आहेत. विद्यापीठातील टाकून दिलेल्या खराब लाकडांच्या आधारे या कलाकृती विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. या कलाकृतींचे बाजारमूल्य पाचशे ते पाच हजार रुपये एवढे आहे. या प्रयोगाला व्यावसायिक स्वरूप देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.  

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. प्रभाकर देसाई म्हणाले, विद्यापीठाचा विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न असतो. येणाऱ्या काळात कमवा-शिका योजनेचे पारंपरिक स्वरूप बदलून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी कागदापासून पिशव्या, स्क्रीन प्रिंटिंग, हॅंडमेड पेपर, विद्यापीठातील टेकडीचा विकास यांसारख्या जवळपास १५ प्रकारच्या योजना यावर्षी राबण्याचा मानस आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या वस्तू मिळतील, असे दालन उभारले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रोमानियन थ्रेड स्टिंग आर्ट कलाप्रकारातील वस्तूंना भरपूर मागणी आहे. कमवा शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात या प्रकारच्या कलाप्रकाराच्या आधारे स्वयंरोजगार संधी आहे.
- राहुल ठाकरे, कमवा-शिका योजनेतील विद्यार्थी

Web Title: earn and learn handwork