जास्त पैसा म्हणजे यशस्वी नव्हे- अतुल कुलकर्णी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. यशस्वी माणूस म्हणजे जास्त पैसा असलेली व्यक्ती ही व्याख्या बदलली पाहिजे, असे परखड मत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. 

पुणे- पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. यशस्वी माणूस म्हणजे जास्त पैसा असलेली व्यक्ती ही व्याख्या बदलली पाहिजे, असे परखड मत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. 

एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सभागृहात "बिहेव्हिअरल इंटरव्हेन्शन फॉर लाइफस्टाइल डिसऑर्डर' यांच्या वतीने "शरीर व मन तंदुरुस्त कसे ठेवावे' या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. 

कुलकर्णी म्हणाले, ""व्यवसाय हा आयुष्यातील एक छोटा भाग असून, त्यातून चिंता, ताणतणाव, भीती वाढून मानसिक आरोग्य बिघडते. मला काय हवे हे दुसऱ्याकडे पाहून ठरविले जाते. पैसा हे साधन आहे साध्य नव्हे; पण यशस्वी माणूस म्हटले की जास्त पैसा मिळविलेली व्यक्ती ही व्याख्या सर्रास वापरली जाते. जीवनाच्या अशा अनेक व्याख्या बदलल्या पाहिजेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचा अर्थ लावणे म्हणजे जगातील तत्त्वज्ञान होय.'' 

ते म्हणाले, ""नटरंग चित्रपटासाठी 16 किलो वजन वाढविल्यानंतर 18 किलो वजन कमी करणे हे आव्हानात्मक काम होते. शास्त्रशुद्ध व्यायाम, संतुलित आहारातून ते साध्य केले. फिटनेस हा शब्द मागे पडून आता वेलनेस हा शब्द रूढ झाला आहे. सडपातळ असणे म्हणजे उत्तम आरोग्य असे नव्हे. प्रत्येकाची शरीररचना, आजार, अपघाताच्या इतिहासानुसार व्यायाम ठरतो. सरसकट सर्वांना एकच नियम असे असत नाही. माझ्या घरात सोफा, डबलबेड, फ्रिज, वॉशिंग मशिन, टीव्ही नाही, त्यामुळे माझ्या शारीरिक हालचाली होऊन आरोग्य उत्तम आहे. गांधी विरुद्ध गांधी नाटकाच्या प्रवासातून मला न संपणारा गांधी नावाचा माणूस सापडला.'' 

आधीचा आस्तिक आता मी नास्तिक 
गुरू संकल्पनेवर माझा विश्‍वास नसून प्रयत्नांवर आहे. गुरूला देवत्व दिल्यामुळे आपण विचार करणे सोडून देतो. देव, धर्म, पूर्वजन्म, जात आणि कर्मकांडे या मानवनिर्मित गोष्टी, त्या मी मानत नाही. एकेकाळी मी आस्तिक होतो; पण आता नास्तिक आहे. अनुभवातून मी बदललो आहे. जन्म जसा सत्य आहे, तसा मृत्यूदेखील अटळ आहे, त्याला शांतपणे सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे, असेही कुलकर्णी यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Web Title: earn money is not success says Atul Kulkarni