पूर्व हवेलीत गुंतवणूकदारांचा ओढा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्‍यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्‍यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.

लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्‍यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्‍यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.

पुणे शहराच्या चारही बाजूला हवेली तालुक्‍याचा विस्तार आहे. मात्र, इतर बाजूंच्या तुलनेत पूर्व हवेलीतील भौगोलिक रचनेमुळे या भागात विकासकामांसाठी कमी खर्च येतो; तसेच येथील प्रस्तावित विकासकामांमुळे अनेक गुंतवणूकदार या भागामध्ये गुंतवणूक करीत आहेत. सध्या या भागामध्ये अनेक भांडवलदार शेतकऱ्यांना भागीदारीत घेऊन त्यांच्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारणीचे काम करत आहेत. गुंतवणुकीचे वाढते प्रमाण व जमिनीच्या वाढत्या बाजारभावामुळे या भागातील आर्थिक स्थिती सुधारत आहे. 

दौंड, शिरूर व पुरंदर तालुक्‍यासह परगावाहून आलेले अनेक कामगार पुणे शहर व परिसरात रोजंदारीसाठी जातात. मात्र, पुणे-दौंड रेल्वे व पुणे-सोलापूर महामार्ग या सेवांमुळे उरुळी कांचन, लोणी काळभोर, दौंड तालुक्‍यातील केडगाव, यवत व पाटस या गावांमध्ये त्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक आहे.

सध्या पुणे-दौंड रेल्वेवर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सुरू आहे. आगामी काळात या लोहमार्गाला उपनगरीय रेल्वे घोषित करून विविध एक्‍स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा व गाड्यांची वारंवारता वाढविण्यासाठी स्थानिक प्रवासी संघटनांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये दिवसेंदिवस नागरीकरणात मोठी वाढ होत आहे. दरम्यान, या भागामध्ये नव्याने येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्‍यक सुविधांशी संबंधित सेवांमधून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती शक्‍य आहे.

लहान-मोठ्या व्यवसायांना चालना
प्रस्तावित रिंगरोडमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे; तसेच इतर लहान गावांमध्येदेखील गोदाम, मालधक्के व इतर लहान- मोठ्या व्यवसायांना चालना मिळणार असल्याने साहजिकच रोजगारनिर्मिती वाढणार आहे;  तसेच नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे २० ते २५ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या सर्वच गावांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून, जमिनीच्या खरेदी-विक्रीसारख्या मोठ्या आर्थिक उलाढालीतून सरकारच्या महसुलामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: east haveli investment