भीतीवर मात करण्यासाठी जगात शांती आवश्यक : डॉ. सोहोळकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

''पवित्र शास्त्राप्रमाणे एदेन बागेत हवा या स्त्रीद्वारे भीती आणि पाप या जगात आले. त्यामुळे भीतीचे मुख्य कारण म्हणजे आपली पापे आहेत. आपण जन्मापासून ते मरेपर्यंत भीत असतो. भीतीही प्रत्येकालाच असते. आता गरज आहे, शांतीची''.

-  पास्टर डॉ. ज्ञानेश्वर सोहोळकर

पुणे : ''जन्मापासून मरेपर्यंत माणसाला भीती वाटतेच. शांती नसल्यामुळे प्रत्येकालाच भीती वाटते. भीतीचे मुख्य कारण म्हणजे पाप होय. त्यामुळे सध्या गरज आहे ती शांतीची. त्यामुळे भीतीवर मात करण्यासाठी जगात शांती आवश्यक आहे'', असा उपदेश पास्टर डॉ. ज्ञानेश्वर सोहोळकर यांनी आज (रविवार) केला.

ईस्टर संडेनिमित्त इम्मान्युएल चर्च, गंज पेठ येथे आयोजित भक्तीसमयात ते बोलत होते. चर्चचे पास्टर रेव्ह. अनिल इनामदार यांच्यासह अनेक ख्रिस्ती बांधव यावेळी उपस्थित होते. ईस्टर संडे म्हणजे पुनरुत्थान दिवस. प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर खिळविण्यात आल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचे मरणातून जीवंत होणे, हे या पुनरुत्थान दिनाचे महत्त्व आहे. या ईस्टर संडेनिमित्त डॉ. सोहोळकर यांनी उपस्थित ख्रिस्ती बांधवांना उपदेश केला. यावेळी त्यांनी दु:ख, भीती आणि संशय या महत्वपूर्ण बाबींवर आपले विचार पवित्र शास्त्राच्या माध्यमातून व्यक्त केले.

ते म्हणाले, ''पवित्र शास्त्राप्रमाणे एदेन बागेत हवा या स्त्रीद्वारे भीती आणि पाप या जगात आले. त्यामुळे भीतीचे मुख्य कारण म्हणजे आपली पापे आहेत. आपण जन्मापासून ते मरेपर्यंत भीत असतो. भीतीही प्रत्येकालाच असते. आता गरज आहे, शांतीची. त्यामुळे भीतीवर मात करण्यासाठी जगात शांती आवश्यक आहे. पवित्र शास्त्रामध्ये तब्बल 366 वेळा 'भिऊ नको', असे वचन आहे. सध्या देवाच्या शांतीची गरज आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे शांती होय. त्यामुळे देवावर पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. आंधळा विश्वास देवाला नको. तसेच कोणत्याही गोष्टीत संशय असू नये. त्यामुळे विश्वास हा महत्वाचा आहे''.

डॉ. सोहोळकर यांच्या उपदेशानंतर चर्चमध्ये प्रभूभोजन विधी पार पडला. तसेच बरेलीहून आलेल्या सिस्टर निशा निर्दोष यांनी चर्चमध्ये गीत सादर केले. त्यांच्या या गीताला उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला.      

Web Title: Easter News Emmanuel Church Pune For Fear World need Peace says Pastor Dr Soholkar