पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे श्रेय सर्वांचेच

अविनाश चिलेकर
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कोणताही नवीन विचार मूळ धरायला काहीसा वेळ जातो. मात्र, एकदा का नागरिकांना त्यात तथ्य दिसले की जनता त्याचे मनापासून अनुकरण करते. शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे त्याचे एक चांगले उदाहरण. पर्यावरणाला घातक असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवू नका, त्याऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसवा. बंदी असल्याने आता देखावा सजावटीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर कटाक्षाने टाळा, त्याऐवजी प्लायवूड, कागद अथवा कपडा वापरा. जलप्रदूषण टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मूर्तींचे विसर्जन नदीत करू नका.

कोणताही नवीन विचार मूळ धरायला काहीसा वेळ जातो. मात्र, एकदा का नागरिकांना त्यात तथ्य दिसले की जनता त्याचे मनापासून अनुकरण करते. शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे त्याचे एक चांगले उदाहरण. पर्यावरणाला घातक असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवू नका, त्याऐवजी शाडू मातीच्या मूर्ती बसवा. बंदी असल्याने आता देखावा सजावटीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर कटाक्षाने टाळा, त्याऐवजी प्लायवूड, कागद अथवा कपडा वापरा. जलप्रदूषण टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मूर्तींचे विसर्जन नदीत करू नका.

त्याऐवजी मूर्ती दान करा. जमल्यास घरीच बादलीत पाणी घेऊन विजर्सन करा आणि ते पाणी फूलझाडीसाठी कुंडीत टाक. निर्माल्य नदीत टाकण्यापेक्षा पालिकेच्या कुंडात टाका आणि त्यापासून गांडूळ खत बनवा. मिरवणुकीत कानठळ्या बसविणारा डीजे नकोत, त्याऐवजी पारंपरिक ढोल वाजवा.

गुलालाचा वापर टाळा आणि फुलांच्या पाकळ्या वापरा आदी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीचा प्रचार होता. ‘पर्यावरणपूरक गणेश’ हा गेले दहा- पंधरा वर्षे प्रचारच अधिक होता आणि काम नाममात्र होते. सुदैवाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पर्यावरणप्रेमी. त्यांनी हा कार्यक्रम फारच मनावर घेतला. आजवर या विषयावर काम करणाऱ्या सर्व संस्था, संघटनांना त्यांनी आवाहन केले. स्वतः नदी घाटावर थांबून मूर्तिदान स्वीकारले. पालिकेची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कामाला लावली. अशा प्रकारे पूर्ण राजाश्रय मिळाल्याने या वेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्रत्यक्षात दिसला, यशस्वी झाला. हजारो कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र केली म्हणून अर्थातच त्याचे श्रेय सर्व संस्था, संघटनांनाही आहे.

मूर्ती बनवा स्पर्धा, स्तुत्य उपक्रम
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नकोत म्हणून शाडूच्या मूर्ती बसवा हे सांगितले गेले. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला म्हणून शाडू मूर्ती कमी पडल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरातील विविध किमान पन्नास संस्था, संघटना, शाळा, मंडळांनी मूर्ती बनविण्याच्या स्पर्धा घेतल्या. त्यातून योग्य संदेश घराघरांत गेला. प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या मूर्ती बनवा, रंगवा आणि घरी प्रतिष्ठापना करा, या उपक्रमात किमान पाचशेवर कुटुंब (मुले आणि त्यांचे आई-बाबा) सहभागी झाले होते. विशेष म्हणजे सर्वांनी त्याच मूर्तींची प्रतिष्ठापना केली आणि घरीच विसर्जनही केले. त्यात सर्वांना श्रद्धा, समाधान आणि आनंदही मिळाला. आगामी काळात अशाच पद्धतीने शहरातील सर्वच शाळांनी उपक्रम राबविला पाहिजे. 

नदी प्रदूषण आणि एकूणच पर्यावरणासाठी झटणाऱ्यांनी त्यात मदत करावी. औद्योगिक कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीतून मदत केली तर आर्थिक भार हलका होईल. महापालिकेसह सर्व पर्यावरणप्रेमी एका व्यासपीठावर आले तर हे सहज शक्‍य आहे. घरगुतीप्रमाणे सार्वजनिक मंडळांनीही या दिशेने विचार करायला हरकत नाही. हुल्लडबाजी, धांगडधिंगा, कानठळ्या बसविणारे आवाज, मिरवणुकीतील कार्यकर्त्यांचे मद्यपान, आतषबाजी याला सर्व जनता जाम वैतागली आहे. विचार करा, सध्याच्या ओंगळवाण्या सार्वजनिक उत्सवाची पूर्ण दिशाच बदलेले.  

मूर्तिदान, निर्माल्य दान
शहरात आज मितीला पाच लाख कुटुंबांपैकी किमान दीड लाख घरांतून गणपती असतात. त्यापैकी किमान ७० हजारांवर मूर्तींचे दान मिळाले. मूर्तिदान चळवळीच्या गेल्या वीस वर्षांतील आजवरचे हे सर्वांत मोठे यश आहे. टाटा मोटर्स कंपनीचे मनोहर पाराळकर यांनी या उपक्रमाची पायाभरणी केली आणि संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन गायकवाड यांनी त्यावर कळस चढविला. त्यामुळेच आता नाल्यांच्या सांडपाण्याने महागटार झालेल्या नदीत मूर्ती विसर्जन करायला लोकच तयार नाहीत. 

महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी स्वतःहून पुढाकार घेतल्याने हे झाले. महापालिकेनेही विविध घाटांवर २६ ठिकाणी हौद बांधले. लोकांनी स्वखुशीने तिथे विसर्जन केले. पवना, इंद्रायणी, मुळा या तीनही नद्यांमध्ये जाणाऱ्या मूर्ती वाचल्या. दान मिळालेल्या मूर्ती महापालिकेच्या मदतीने वाकडच्या दगडी खाणीत विसर्जित केल्या. संस्कार प्रतिष्ठान, टाटा मोटर्स, तनपुरे प्रतिष्ठान, डी. वाय. पाटील प्रतिष्ठान, मोरया सामाजिक प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक महासंघ अशा सर्वांनी त्यात हातभार लावला.

 दुसरे महत्त्वाचे म्हणजे दहा दिवसांच्या निर्माल्यामुळे नदीची कचराकुंडी होते. या वेळी हाउसिंग सोसायट्यांतून निर्माल्य संकलन फेरीत हजारो किलो निर्माल्य मिळाले. त्या बदल्यात गांडूळ खत वाटप हा आणखी स्तुत्य उपक्रम झाला. अनंत चतुर्दशीला तब्बल ३५ टन निर्माल्य नदीत जाण्यापासून वाचविण्यात आले. तमाम गणेशभक्तांनीही मनाचा मोठेपणा दाखविल्याने हे घडले. सर्वांनाच लाख लाख धन्यवाद!

Web Title: Eco Friendly Ganeshotsav no Pollution Environment