आर्थिक विकास झाला, रोजगार मात्र वाढला नाही : प्रा. जयती घोष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

पुणे : मागील तीस वर्षांपासून जगातील सर्वात जलद आर्थिक विकास आपल्या देशामध्ये झाला आहे. परंतु, यामधून संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मात्र तेवढ्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. याचा परिणाम महिलांच्या रोजगारावरही झाला आहे, असे प्रतिपादन प्रा. जयती घोष यांनी केले. 

पुणे : मागील तीस वर्षांपासून जगातील सर्वात जलद आर्थिक विकास आपल्या देशामध्ये झाला आहे. परंतु, यामधून संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मात्र तेवढ्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. याचा परिणाम महिलांच्या रोजगारावरही झाला आहे, असे प्रतिपादन प्रा. जयती घोष यांनी केले. 

विचारवेध असोसिएशन आणि एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विचारवेध संमेलनाच्या पहिल्या सत्रातील "राष्ट्रीय धोरणांसमोरील आव्हाने' या विषयावर घोष बोलत होत्या. या वेळी प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, विचारवेध संमेलनाचे समन्वयक विनायक पंडित, आनंद करंदीकर, कविता आव्हाड, मुक्ता मनोहर आदी उपस्थित होते. संमेलनाची सुरवात स्त्री मुक्ती संघटनेच्या शाहिरी जलसाने झाली. विचारवेधतर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. 

घोष म्हणाल्या, "ही वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी मोदी सरकार रोजगाराविषयीची कुठलीही आकडेवारी द्यायला तयार नाही. मनरेगा सारख्या महत्त्वाच्या योजनांचा निधी कमी करून ही योजनाही केंद्र सरकार बंद करण्याच्या तयारीत आहे. जे रोजगार राहिले आहेत त्यामध्ये असुरक्षितता वाढली आहे.'' 

गोडबोले म्हणाले,"आज विषमतेने उच्चांक गाठला आहे. शिक्षण, आरोग्यासारख्या प्राथमिक आवश्‍यक गोष्टींच्या तरतुदीपैकी निम्मी रक्कमही खर्च केली जात नाही. देशातील एक टक्का श्रीमंत लोकांकडे देशाची 58 टक्के संपत्ती आहे. हे प्रमाण देशातील 90 टक्के लोकांकडील संपत्तीच्या तीन पट जास्त आहे. देशातील 30 टक्के लोकांकडे संपत्तीच नाही. यातून प्रचंड आर्थिक विषमता वाढली. ती या व्यवस्थेत संपेल असे वाटत नाही.'' 

Web Title: Economic development, employment not increased: Pvt. Jayati Ghosh