मध्यम व छोट्या शहरांकडे गुंतवणुकीचा रोख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे - ‘‘भारत आणि अमेरिके दरम्यानचा व्यापार पाच पटींनी वाढला असून, व्यापारवृद्धीसाठी उभय देशांकडून होत असलेले प्रयत्न पाहता हा व्यापार आणखी वाढेल. या पुढच्या काळात होणाऱ्या गुंतवणुकीचा रोख मध्यम आणि छोट्या शहरांकडे राहील,’’ असे मत अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत एडगार्ड डी. केगन यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

पुणे - ‘‘भारत आणि अमेरिके दरम्यानचा व्यापार पाच पटींनी वाढला असून, व्यापारवृद्धीसाठी उभय देशांकडून होत असलेले प्रयत्न पाहता हा व्यापार आणखी वाढेल. या पुढच्या काळात होणाऱ्या गुंतवणुकीचा रोख मध्यम आणि छोट्या शहरांकडे राहील,’’ असे मत अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत एडगार्ड डी. केगन यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

व्यापार व गुंतवणुकीव्यतिरिक्त भविष्यातील दोन्ही देशांदरम्यानच्या सहकार्याची प्रमुख क्षेत्रे आणि ‘एच - १ बी’ व्हिसासह अनेक विषयांवर ‘सकाळ’ने केगन यांच्याशी संवाद साधला. पुण्यासारख्या वाढणाऱ्या शहरांमध्ये गुंतवणूक करायला अनेक अमेरिकी उद्योग उत्सुक आहेतच, पण भारतातल्या उद्योगांनाही अमेरिकेत गुंतवणूक करण्यात अधिक रस निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

संरक्षणाबरोबरच भविष्यात भारतातल्या शेती, ऊर्जा, उत्पादन आणि आरोग्य सेवांसह अन्य सेवाक्षेत्रात गुंतवणूक करण्यात अमेरिकेला रस असेल, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. यापैकी ऊर्जा क्षेत्रात सहकार्याला मोठा वाव असून नैसर्गिक वायू, तेल किंवा अन्य स्रोतांवर आधारित ऊर्जानिर्मिती; तसेच अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी अमेरिका मदत करू शकेल. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या कल्पनांमध्ये कोणताही विरोधाभास नाही, यावरही त्यांनी भर दिला.

दोन्ही देशांनी मिळून ‘सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी एन्डोमेंट फंड’ स्थापन केला असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील कार्यक्षम उद्योजकांचा आणि संशोधकांचा मोठा फायदा होईल, असेही ते म्हणाले. ‘एच - १ बी’ व्हिसाबाबतचा निर्णय भारतापुरता नसून सगळ्याच देशांशी संबंधित आहे, असे केगन यांनी स्पष्ट केले. याबाबतीतही काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत, असेही ते म्हणाले.

पुणे महत्त्वाचे शहर
पुण्यातील विद्यार्थ्यांची संख्या आणि येथे आधीपासून असलेले अमेरिकी उद्योग पाहता आपल्या वाणिज्यदूतावासाच्या दृष्टीने पुणे हे पश्‍चिम भारतातले एक महत्त्वाचे शहर आहे. आपल्याला पुण्याला यायला आवडते कारण येथील लोक अतिशय उत्साही आहेत आणि येथे खूप काही घडत असते, असेही केगन यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Edgard D. Kegan interview