विधान भवनावर काढणार मोर्चा; सुशिक्षित बेरोजगार परिषदेत निर्धार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

पुणे : ''स्पर्धा परीक्षांच्या जास्त नादी लागू नका, सरकार काहीच करणार नाही. त्यामुळे बेरोजगारांनी स्वतःच संधी शोधावी. आपला वापर केवळ निवडणुकीपुरता होऊ न देता सत्ताधाऱ्यांना जाब विचारा,'' अशा भावना व्यक्त करीत विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार सुशिक्षित बेरोजगार परिषदेत केला गेला. 

पुणे : ''स्पर्धा परीक्षांच्या जास्त नादी लागू नका, सरकार काहीच करणार नाही. त्यामुळे बेरोजगारांनी स्वतःच संधी शोधावी. आपला वापर केवळ निवडणुकीपुरता होऊ न देता सत्ताधाऱ्यांना जाब विचारा,'' अशा भावना व्यक्त करीत विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार सुशिक्षित बेरोजगार परिषदेत केला गेला. 

सुराज्य सेना आयोजित सुशिक्षित बेरोजगार परिषदेत डॉ. बाबा आढाव, विश्‍वंभर चौधरी, राजकुमार धरगुडे पाटील, सुभाष वारे, योगेश जाधव, फारुख अहमद, राजीव भिसे आणि युवकांनी आपली मते मांडली. डॉ. आढाव यांनी कोरेगाव भीमा घटनेचा संदर्भ देत काही लोक युवकांची डोकी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. याबाबत रोखठोक भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. 
ते म्हणाले, ''देशातील एक टक्का राजकारण्यांनी संसदीय मूल्ये सोडून दिली आहेत. एक टक्का लोकांकडे 70 टक्के संपत्ती कशी, याचा विचार केला पाहिजे. साईबाबा गरीब होते; पण आज शिर्डीचे देवस्थान श्रीमंत झाले आहे. या देशात माणूस गरीब, पण देव श्रीमंत आहेत.'' 

वारे यांनी बेरोजगारीचा प्रश्‍न चुकीच्या आर्थिक धोरणांचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले. ''सरकारी नोकरीतील रिक्त जागा भरल्या तरी बेरोजगारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर सुटू शकेल; पण सत्ताधाऱ्यांमध्ये ती राजकीय इच्छाशक्ती नाही. विधान भवनावर मोर्चा काढून आपला हक्क मिळवावा लागेल,'' असेही त्यांनी सांगितले. 

शिक्षणाचा संबंध नोकरीशी लावणे चुकीचे असल्याचे सांगत चौधरी यांनी ज्ञानामुळे रोजगार निर्माण होतो, असे स्पष्ट केले. ''आजचे शिक्षण हे कालबाह्य झाले आहे. त्यामध्ये गुणवत्ता आणि दर्जा राहिला नाही. त्यात कोणीच बदल करीत नाही. सरकार हा निरुपयोगी घटक आहे. त्यामुळे बेरोजगारांनी स्वतः संधी शोधली आणि निर्माण केली पाहिजे,'' असे मत त्यांनी मांडले. धुरगुडे पाटील यांनी बेरोजगारांनी स्पर्धा परीक्षांच्या आहारी न जाता व्यवसायाची वाट निवडावी, असा सल्ला दिला.

Web Title: Educated unemployed youth to protests in Mumbai