#कारणराजकारण : शिक्षण, रोजगाराला द्यावे प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

‘सरकारनामा’ आणि www.esakal.com वरून ‘सकाळ’ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आपल्यालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल?

आपली मते मांडा 
व्हॉट्‌सॲप क्रमांक - ९१३००८८४५९
ई-मेल webeditor@esakal.com (ई-मेलचा subject: #कारणराजकारण)
फेसबुक’वर फॉलो करा fb.com/SakalNews
आपले मत ट्विट करा #कारणराजकारण हा हॅशटॅग वापरून

पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती होणार का? तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना युवकांना मात्र शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराची चिंता आहे, त्यावरच राजकीय पक्षांनी भर दिला पाहिजे, असे या युवकांना वाटते. या निवडणुकीत हेच मुद्दे लक्षात घेऊन मतदारांनी मतदान करावे, अशी अपेक्षा या युवकांची आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने सोशल मीडियावरून प्रचारात कोणते मुद्दे असावेत, याबद्दल तरुणाईला विचारले होते. त्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांनी प्रतिक्रिया नोंदविताना पाण्याच्या टंचाईचाही मुद्दा अधोरेखित केला आहे. शेतीशी संबंधित प्रश्‍नांकडेही प्राध्यान्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांचाही विचार राजकीय पक्षांनी केला पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

गणेश धुमाळ म्हणाले, ‘‘यंदाची विधानसभा निवडणूक ही शैक्षणिक सुविधा, शिक्षणाचा दर्जा, तरुणांना रोजगार, उद्योजकता विकास या मुद्द्यांवर व्हायला पाहिजे.’’ संदीप नागरे यांनी बेरोजगारी, महागाई, महापूर, दुष्काळ, शेती कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, रस्त्यावरील खड्डे, विकास आणि मंदी या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. योगेश खोडके यांनी शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, रोजगारनिर्मिती झाली पाहिजे, यावर भर दिला आहे. गोविंद पाटील नवघरे यांनी राज्य सरकारने पाच वर्षे फक्त जाती-जातींमध्ये भांडणे लावून वेळ काढला, कर्ज माफी ही फसवी होती आणि केवळ पवारांवर टीका केली, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.

रोजगार, महापूर व्यवस्थापन, मंदी, महागाई हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे रवींद्र गायकवाड यांना वाटते. ज्ञानदेव वागवेकर यांनीही रोजगार निर्मिती, मेगाभरती, आरक्षण, आर्थिक मंदी या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मतदार म्हणतात...
धनंजय गायकवाड -
 केंद्र सरकारने देश पातळीवर घेतलेल्या निर्णयांबद्दल राज्यात नक्कीच आनंद आहे. परंतु, त्याचे या निवडणुकीत सरकारने भांडवल करू नये. जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी प्रतिज्ञापत्र करून द्यावे आणि त्यात टाकलेल्या मुद्द्याची पूर्तताही वेळेत करण्याची हमी द्यावी.

उमाजी कदम - शेतकरी, शेतीमाल, पाणीटंचाई, सिंचन, शिक्षण, नोकरी, विकास योजना हे मुद्दे तरुणाईसाठी महत्त्वाचे आहेत. त्याचा विचार करून राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिका जाहीर कराव्यात. ग्रामीण आणि शहरातील भागातील युवकांना शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. 

हर्षल भोसले - शेतकरी तरुण आणि कामगार अडचणीत आहेत. याबद्दल सध्याच्या राज्य सरकारला काही वाटत नाही. मध्यमवर्गीय आणि कष्टकरी यांना मरण स्वस्त वाटू लागले आहे. त्यांचा विचार करून धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Employment Priority Youth Social Media