‘सारा’मुळे शिक्षणाची गोडी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

पुणे - गप्पा, गोष्टी, गाणी, चित्रकला, हस्तकला अन्‌ कधी-कधी गणितातील गमती-जमतीच्या माध्यमातून त्यांनी मुलांना ‘एबीसीडी’शी जोडले. ती मुले शाळेत जातात; पण त्यांना शिक्षणाची गोडी नाही, त्यामुळे त्यांना लिहिता-वाचता येत नाही. अशाच शिक्षणात कच्च्या असलेल्या वस्तीतील मुलांना ‘हुशार’ बनविण्याचा ध्यास ‘सारा फाउंडेशन’च्या तरुण-तरुणींनी घेतला अन्‌ ही मुले आता इंग्रजीत आपले नाव लिहू लागली आहेत. 

सहकारनगर आणि वानवडी येथील सिद्धार्थनगर येथील वस्तीमध्ये फाउंडेशनचे अभ्यास वर्ग सुरू आहेत. वस्तीतीलच सुशिक्षित तरुणींना प्रशिक्षण देऊन त्यांना अभ्यास वर्गात शिकवण्याचे काम दिले आहे. तर फाउंडेशनमधील महाविद्यालयीन असो वा नोकरदार तरुण तेही वस्तीतील मुलांना शिकवण्याचे काम करताहेत. दोन्ही वस्तीत तिसरी ते सातवीतील सुमारे ४० मुलांना शिकवण्याचे काम होत आहे. गेल्या वर्षापासून हे अभ्यास वर्ग सुरू आहेत. 

याबाबत फाउंडेशनची उपसंचालक सुप्रिया पिसाळ म्हणाली,‘‘आम्ही तीन वर्षांपूर्वी फाउंडेशनची स्थापना केली आणि वस्तीतील मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यास वर्ग सुरू केला. सुरवातीला पालक मुलांना वर्गात पाठवत नव्हते; पण हळूहळू विरोध मावळला. आज चाळीस मुले शिकायला येतात. त्यांना एबीसीडीही लिहिता येत नव्हती; ही मुले इंग्रजीत स्वतःचे नाव लिहू शकतात.’’
 
मुलांच्या मदतीसाठी चित्रप्रदर्शन 
सारा फाउंडेशनतर्फे वस्तीतील मुलांच्या मदतीसाठी आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी छायाचित्र आणि चित्रप्रदर्शन भरविले आहे. त्याचे उद्‌घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष इकबाल शेख यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात ६ छायाचित्रकारांनी टिपलेली विविध विषयांवरील छायाचित्रे आहेत. तर ६ चित्रकारांनी रेखाटलेली वेगवेगळी चित्रेही पाहावयास मिळतील. या प्रदर्शनात बालकामगार, बाल हक्क आणि सर्वांगीण शिक्षण अशा विविध विषयांवरील चित्रेही आहेत. हे प्रदर्शन शुक्रवारपर्यंत (ता. २१) सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व कलादालनात पाहावयास खुले राहील.

Web Title: education interest by sara