शिक्षणाबाबत अनास्था

मळवंडी ढोरे - शाळेतून पायी जाणाऱ्या विद्यार्थिनी.
मळवंडी ढोरे - शाळेतून पायी जाणाऱ्या विद्यार्थिनी.

पिंपरी - घरोघरी हजारो रुपयांचे स्मार्ट फोन, गावागावांत लाखो रुपये खर्चून उभारलेली प्रशस्त मंदिरे, वाड्यावस्त्यांच्या रस्त्यांवर उभारलेल्या स्वागत कमानी. मात्र, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची दररोज दहा-बारा किलोमीटरची पायपीट हा विरोधाभास मावळ तालुक्‍यात बघायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या, पर्यटनस्थळांचे जाळे, औद्योगिक विकास आणि पॉलिहाउसच्या माध्यमातून जगात नाव पोचलेल्या मावळात शिक्षणाबाबत अनास्था का? असा प्रश्‍न मावळात येणाऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

मुळशी तालुक्‍यातील मारुंजी, कासारसाई मार्गे मावळ तालुक्‍यात प्रवेश केला. चांदखेड, बेबडओहोळ, बऊर, उर्से, पवनानगर, दुधिवरे, लोणावळा, कार्ला, कामशेत, कान्हे, टाकवे, वडगाव, तळेगाव, इंदोरी, सुदुंबरे आदी भागांत औद्योगिक कंपन्यांचे बऱ्यापैकी जाळे आढळले. परिसरातील गावागावांमध्ये एकापेक्षा अधिक प्रशस्त मंदिरे उभारलेली आहेत. छोट्या गावांतील काही घरांसमोर व रस्त्यांवर आलिशान मोटारी, महागड्या दुचाकी दिसल्या. त्यातून गावांची समृद्धी व श्रीमंती दिसून आली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या ‘निवासस्थानाकडे...’ असे फलक राजकीय दबदबा दर्शवून गेले. मात्र, याच रस्त्यांनी शाळेकडे व शाळेतून घराकडे पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे चेहरे कोमेजलेली दिसली. 

दप्तराचे ओझे
बदललेली शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, पुस्तकांची वाढलेली संख्या, यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढलेले आहे. ते पाठीवर घेऊन सात किलोमीटरपर्यंत चालत जाणे त्रासदायक आहे. यात मुलींची संख्या सर्वाधिक आहे. कारण, मुले दुचाकी अथवा अन्य कुठल्याही वाहनाला लिप्ट मागून जाऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने मुलींना लिप्ट मागून जाणे शक्‍य होत नाही. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - २८३
प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी - २२,०००

विद्यार्थिनी म्हणाल्या...
बेबडओहोळ ते पिंपळखुंटे रस्त्यावर दहावीतील विद्यार्थिनी सुषमा हिंगे, तृप्ती हिंगे, अस्मिता गायकवाड आणि सहावीतील सानिका हिंगे भेटल्या. ओढ्याच्या पुलावरील कठड्यावर त्या बसलेल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘एसटी आहे, पण वेळेवर येत नाही. कधी कधी तर येतच नाही. त्यामुळे आम्ही चालतच येतो. एक तास झाले शाळेतून निघालोय. अजून अर्धा-पाऊण तास लागेल.’’ आमच्या मोटारीत बसायला त्यांनी नकार दिला. त्यामुळे पुढे निघालो. त्यानंतर आठवी-नववीचे तीन विद्यार्थी एका दुचाकीवर बसून सुसाट आम्हाला ओव्हरटेक करून निघून गेले. धोकादायकपणे. पुढे मळवंडी-ढोरे रस्त्यानेही विद्यार्थी पायी जात होते. एसटीची वाट न बघता. त्यात मुलींची संख्या जास्त होती. त्यांना कंपन्यांनी, सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अथवा सेवाभावी संस्थांनी वाहनव्यवस्था किंवा सायकली उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

पहिली ते पाचवी एक किलोमीटर, सहावी ते आठवी तीन किलोमीटर, नववी ते दहावी पाच किलोमीटर आणि ११ वी व १२ वीचे विद्यार्थी सात किलोमीटरपर्यंत चालत जाऊ शकतात, असा सरकारचा निर्णय आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत धोरण राबविले जात आहे.  
- मंगला वाव्हळ, गटशिक्षणाधिकारी, मावळ

शाळा व घर यातील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सायकल देण्याची योजना आहे. त्यासाठी सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. त्यासंदर्भात केंद्र प्रमुखांकडून विद्यार्थ्यांची संख्या मागवली आहे.
- गुलाबराव म्हाळसकर, सभापती, पंचायत समिती मावळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com