
MHT-CET Exam : आजपासून एमएचटी -सीईटीची परीक्षा; जाताना ही घ्या काळजी...
पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमांसाठीची एमएचटी सीईटी २०२३ मंगळवार (ता.९) पासून सुरू झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेतील पीसीएम ग्रुपची परीक्षा ९ ते १४ मे यादरम्यान आणि पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ ते २० मे या कालावधीत होणार आहे.
मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांसह पालकांमचीही परीक्षा केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली आहे. लांबचे परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांची थोडी गडबड उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याबद्दल पालकांमध्येही थोडी नाराजी दिसत होती. खरं तर इयत्ता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
सरकारी महाविद्यालया बरोबरच चांगल्या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून अनेक महिन्यांपासून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. विद्यार्थ्यांबरोबरच खरेतर पालकांचीही या काळात परीक्षा सुरू असते. विद्यार्थ्यांसह पालकांवरही ताण असतो. आता परीक्षेसाठी जाताना आवश्यक त्या गोष्टींचे नियोजन आतापासूनच करायला हवे. अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागू शकते.
परीक्षेसाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेश पत्र. परीक्षा कक्षाकडून सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी प्रवेश पत्र अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढून घ्यावी. ही प्रिंट घेतली नसेल, तर विद्यार्थ्यांनो लगेचच कामाला लागा. याशिवाय विद्यार्थ्यांना खालील गोष्टींचीही दक्षता घ्यावी लागेल.
परीक्षेला जाताना ही घ्या काळजी -
प्रवेशपत्र, आवश्यक लेखन साहित्य आणि पाण्याची बॉटल जवळ असावी
प्रवेशपत्रावरून परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी काळजीपूर्वक वाचावे.
नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचे मुख्यद्वार बंद होण्याच्या वेळेपूर्वी पोहचण्यासाठी योग्य ते नियोजन करावे.
परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जावे.
पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट आदी ओळखपत्र सोबत ठेवावीत.
दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्वाबाबतचे मुळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्रावरील सुचनांचे वाचन करून त्याप्रमाणे पालन करावे