Pune News : धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे; चार वर्षांपासून दुर्लक्ष
education of students in dangerous building gujar nimbalkarwadi zilla parishad school
education of students in dangerous building gujar nimbalkarwadi zilla parishad schoolsakal

कात्रज : गुजर-निंबाळकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल २०१८-१९मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला देण्यात आला. मात्र, तेव्हापासून केवळ वेळकाढूपणाची भूमिका दोन्ही प्रशासनाने घेतली असून मागील चार वर्षापासून या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे जीव मुठीत घेऊन शिक्षण सुरु आहे.

ही शाळा दुमजली असून पहिल्या मजल्यावर तीन तर दुसऱ्या मजल्यावर दोन वर्गखोल्या आहेत. यामधील दुसऱ्या मजल्यावरील खोल्या जीर्ण अवस्थेत असून मुले खेळताना इमारत कंपन पावते. त्यामुळे ही संपूर्ण इमारत पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी तो प्रत्यक्षात मात्र उतरवलेला नाही. ग्रामस्थ इमारत स्वखर्चातून पाडण्यास तयार आहेत.

मात्र, पुन्हा शाळा कुठे भरवायची हा प्रश्न अनुत्तरित असल्याने इमारत पाडता येत नाही. अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असून ही शाळा कोणत्या परिस्थितीत उभी आहे याची कल्पनाही अधिकाऱ्यांना नाही. केवळ वेळकाढू भूमिका घेत उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार शाळेकडून इमारतीचा अहवाल तयार करण्यात आला असून सर्व अहवाल सादर केल्यानंतर संपूर्ण शाळा पाडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने निधी नसल्याचे कारण देत इमारत पाडण्यास असमर्थता दर्शविली आहे. दुसरीकडे बसण्याची व्यवस्था न करता त्या शाळेच्या इमारतीत शाळा न भरविण्याचा आदेशही पंचायत समितीने काढण्याचे काम केले.

सद्यस्थितीत दुसऱ्या मजल्यावरील दोन वर्गखोल्यात शाळा न भरविता दोन सत्रांमध्ये खालच्या तीन वर्गात शाळा भरविण्यात येते. मात्र, त्यामुळे धोका टळलेला नसून तो वाढला आहे. कारण, दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोल्याच्या भिंतीचा कोणताही भाग कोसळून विद्यार्थ्यांना जखम होऊ शकते.

तपशील

  • शाळेचे बांधकाम - २००५

  • वरील दोन वर्गखोल्याचे काम - २००७

  • एकूण वर्ग खोल्या - ५

  • अतिधोकादायक खोल्या - २

  • शाळेचा एकूण पट - ८७

  • वर्ग - पहिली ते सातवी

  • शिक्षक संख्या - ५

  • सद्स्थिती - अनेक ठिकाणी भिंतीला तडे, जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण

गावांचा समावेश महापालिकेत होण्यापूर्वी सातत्याने नव्याने इमारत करण्यासंबंधी आम्ही पाठपुरावा केला. परंतु प्रशासनाने याला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. आता महापालिकेत समावेश झाला असला तरी शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण झाले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी आमची अवस्था झाली आहे.

- व्यंकोजी खोपडे, माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी

नव्याने समाविष्ट गावातील कोणतीही शाळा महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे त्यावर आम्हाला कोणतीही कार्यवाही करता येत नाही.

- मीनाक्षी राऊत, प्रशाकिय अधिकारी, शिक्षण विभाग, पुणे महापालिका

धोकादायक इमारतीत शाळा भरविण्यात येत असल्याची कल्पना मला नव्हती. याबाबतीत सविस्तर माहिती घेऊन अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.

शाळेमध्ये पाच वर्गखोल्या अन् पाच शिक्षक असून त्यातील दोन वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गखोल्यांमध्ये दोन सत्रात शाळा भरविण्यात येत आहे. आगामी काळात महापालिकेशी समन्वय साधून इमारतीतबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

- नीलिमा म्हेत्रे, गट शिक्षणधिकारी, हवेली पंचायत समिती

मुले जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. मुलांना शाळेत पाठवताना भिती वाटते. एखादा खडा जरी डोक्यात पडला तरी मोठी जखम होईल. प्रशासन चार वर्षापासून एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न पडतो.

- लहू खोपडे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com