नापास करणाऱ्या शाळांना लगाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सर्व शाळांना नववीचा निकाल शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करणे, त्याबरोबरच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती देऊन फेरपरीक्षेचे नियोजन करणे बंधनकारक केले जाणार आहे. येत्या जून महिन्यापासून शाळांनी यानुसार कार्यवाही करायची आहे.
- मीनाक्षी राऊत, प्रभारी शिक्षण उपसंचालक

पुणे - दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून नववीत अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांना लगाम लागणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळांना आता नववीचा निकाल आणि त्यांच्या फेरपरीक्षेचे नियोजन शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक केले जाणार आहे.

आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही, असे सरकारी धोरण असल्यामुळे विद्यार्थी नववीत गेला, की त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. त्याची शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसेल, तर त्याला अनुत्तीर्ण करण्याची पद्धत रूढ झाली आहे. दहावीत शाळांची कामगिरी चमकदार दिसावी म्हणून असे प्रकार केले जात असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे तत्कालीन शिक्षण सचिवांनी नववीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा आदेश दोन वर्षांपूर्वी जारी केला होता. मात्र, अनेक शाळांमध्ये फेरपरीक्षा घेतली जात नाही. 

ही परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा आदेश शाळांना दिला आहे. मात्र, यावर सरकारी यंत्रणेची नजर नाही. 

याबाबत प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार शाळांना ही परीक्षा घेणे बंधनकारक आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी दिलीच पाहिजे. नववीच्या निकालाची आतापर्यंत माहिती घेतली जात नव्हती, ती आता घेण्यात येईल.’

Web Title: Education School Fail Student