TET Exam : टेट’च्या निकालाची अजूनही प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education TET Exam results 24th March Examination Council court pune

TET Exam : टेट’च्या निकालाची अजूनही प्रतिक्षा

पुणे : राज्यात तब्बल पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दोन आठवडे उलटले तरी परीक्षेचा निकाल अजूनही घोषित करण्यात आलेला नसून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शुक्रवार (ता.२४) पर्यंत निकाल जाहीर करण्याचे घोषीत केले आहे.

परीक्षा परिषदेकडून २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ऑनलाइन पद्धतीने टेटची परीक्षा घेण्यात आली. मात्र, आयबीपीएस या नामांकीत संस्थेने घेतलेली परीक्षा नक्की शिक्षकांसाठी होती का बॅंकेच्या अधिकाऱ्यांसाठी, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला होता. त्यामुळे परीक्षेतील प्रश्नांच्या पद्धतीवरच काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता.

तर दूसरीकडे पाच मार्चपूर्वीच परीक्षेचा निकाल घोषीत करण्याच्या न्यायालयीन आदेशाकडे परीक्षा परीषदेने दूर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. राज्यभरातील तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली असून, शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

त्यानुसार २०१७ नंतर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचा मुहूर्त शासनाला सापडला होता. तीन मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेचा निकाल पाच मार्च रोजी जाहीर होणे अपक्षीत होते. मात्र, निकाल लांबत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढत आहे. परीक्षा परीषदेने संकेतस्थळावर तात्पुरता दिलासा दिल्याने उमेदवार रोज निकालाची वाट पाहत आहे.

पवित्र पोर्टलवर करावी नोंदणी

- टेटचा निकाल घोषित झाल्यानंतर उमेदवारांना पवित्र पोर्टवर नोंदणी करावी लागणार आहे.

- ज्यामध्ये सी-टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना संधी उपलब्ध होणार असून, त्यानंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहीरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होईल.

- उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यावर गुणानुक्रमे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्ता यादीतील उमेदवारांची शिफारस करता येईल

आकडे बोलतात...

- राज्यभरातील शिक्षकांची रिक्त पदे ः ६५ हजारांपेक्षा जास्त

- पहिल्या टप्प्यातील भरतीची घोषणा ः ३० हजार

- आत्ता पार पडलेल्या टेट परीक्षेतील उमेदवारांची संख्या ः दोन लाख ३९ हजार

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षण व क्रिडा विभागाच्या सचिवांना ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश दिला होता. ज्यात ५ मार्च पूर्वीच निकाल घोषीत होणे अपेक्षीत होते. अजूनही परीक्षा परिषदेने निकाल घोषित न केल्यामुळे उमेदववार संभ्रमात आहे.

- अजय कोळेकर

परीक्षा परीषदेने आता २४ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे आमचा जीव भांड्यात पडला, पण रोज संकेतस्थळ चेक करत निकालाची प्रतिक्षा करत आहे.

- श्रद्धा जाधव (नाव बदललेले)