केंद्र सरकारने मंजूर केलेले शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेले शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार

पुणे - केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थी हे पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील शिक्षणाप्रमाणे विविध विषयात पारंगत होतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता.७) येथे बोलताना केले. प्राथमिक शिक्षकांनीसुद्धा त्यांचे अध्यापनाचे काम हे व्यावसायिक भावनेतून न करता एक उदात्त ध्येय म्हणून सेवाभावनेने केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दिले जाणारे यंदाचे जिल्हा शिक्षक, गुणवंत शिक्षक आणि केंद्रप्रमुख आणि अध्यक्ष चषक पुरस्कार बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शाळा आणि शिक्षकांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदेतील भाजपचे माजी गटनेते शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणातील टप्पे बदलण्यात येणार आहेत. राज्य सरकार शिक्षणावर मोठा खर्च करते. शिक्षकांनी ही बाब लक्षात घेऊन मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासह ते संस्कारित होतील, यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. कारण इंग्रजांनी विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या सोयीनुसार शिक्षणपद्धतीची रचना केली होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा मूळ गाभा पुन्हा एकदा देशातल्या नागरिकांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न आहे.लहान वयात झालेले संस्कार घेऊनच मुले पुढे जात असतात.’

‘शैक्षणिक विकासासाठी ‘सीएसआर’ निधी मिळवा’

सद्यःस्थितीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आणखी खूप काम करण्याची गरज आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींनी स्वतःला वेळेत बांधून न घेता अधिक वेळ काम करण्याची गरज आहे. यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक विकासात स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे. शिवाय शैक्षणिक विकासासाठी ‘सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर फंड) अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राज्य सरकार शिक्षणासाठी सर्व ते सहकार्य करेल. पण सरकारचा निधी हा शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह बांधणे, क्रीडाविषयक सुविधा निर्माण करणे, ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळेसाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी वापरण्यात यावा, असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला.

Web Title: Educational Policy Approved By Central Government More Beneficial For Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..