पॅकेजिंग इंडस्ट्रीजवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचा पॅकेजिंग इंडस्ट्रीजवर मोठा परिणाम झाला असून, या कंपन्यांतील अनेक कुशल कामगारांचा रोजगार धोक्‍यात आला आहे.

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाचा पॅकेजिंग इंडस्ट्रीजवर मोठा परिणाम झाला असून, या कंपन्यांतील अनेक कुशल कामगारांचा रोजगार धोक्‍यात आला आहे.

प्लॅस्टिक क्षेत्रातील कंपन्या प्रामुख्याने पिंपरी, चिंचवड, पिरंगुट, तळेगाव दाभाडे, रांजणगाव, चाकण, शिरवळ आदी ठिकाणी आहेत. या उद्योगात इंजेक्‍शन मोल्डिंग, पॅकेजिंग असे प्रकार आहेत. इंजेक्‍शन मोल्डिंग या प्रकारातील उद्योग ऑटोमोबाईल कंपन्यांना लागणारे सुटे भाग (मडगार्ड, बंपर इ.) पुरवितात. पॅकेजिंग प्रकारातील उद्योग उत्पादित वस्तूंच्या वेस्टनासाठी प्लॅस्टिक पिशव्या पुरवितात. वेस्टनासाठी प्लॅस्टिकच्या कागदाचाही वापर केला जातो, त्याला रबराचा पर्याय आहे. परंतु प्लॅस्टिकच्या तुलनेत त्यासाठी तिप्पट किंमत मोजावी लागते. उद्योजकांना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे सद्यःस्थितीत प्लॅस्टिक कागदाला कोणताही सक्षम पर्याय उद्योजकांकडे नाही.

पुणे शहर व परिसरातील प्लॅस्टिक पॅकेजिंग उद्योगाची स्थिती
कंपन्या - 250
गुंतवणूक - 200 कोटी रुपये
कामगार - 40-50 हजार

उद्योगांमध्ये पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या या १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या नसतात. वापरलेल्या या पिशव्यांचे ९० टक्के संकलन होते. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही आहेत. त्यामुळे औद्योगिक वापरासाठीच्या प्लॅस्टिकला बंदीतून वगळावे, अशी मागणी आम्ही केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
- संदीप बेलसरे, कार्यकारी अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ सुरू केली आहे, त्यामुळे या कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्यांपुढे त्यांनी उत्पादित केलेला माल या बहुराष्ट्रीय कंपन्यांना कसा पाठवायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- नितीन कोंढाळकर, उपाध्यक्ष, पिंपरी- चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम

Web Title: effect on packaging industry