प्लॅस्टिकबंदीचा फूल व्यावसायिकांवर परिणाम (व्हिडिओ)

अवधुत कुलकर्णी
सोमवार, 25 जून 2018

पिंपरी: प्लॅस्टिकबंदीचा फुलांचे उत्पादक, किरकोळ विक्रेते यांना फटका बसू लागला आहे. फुलांचा बुके करण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद झाल्याने नागरिक एखादी भेटवस्तू देण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत.

पिंपरी: प्लॅस्टिकबंदीचा फुलांचे उत्पादक, किरकोळ विक्रेते यांना फटका बसू लागला आहे. फुलांचा बुके करण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद झाल्याने नागरिक एखादी भेटवस्तू देण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत.

प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून कारवाई सुरू झाली आहे. फुलांच्या व्यवसायात प्लॅस्टिकचा वापर जास्त होता. परंतु बंदीमुळे व्यापारी, फुले उत्पादक शेतकरी, ग्राहक यांना प्लॅस्टिकला योग्य पर्याय अद्याप उपलब्ध न झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण वाढदिवसानिमित्त भेटायला जाताना, काही यश मिळविल्याबद्दल सत्कार करताना भेट म्हणून फुलांचे बुके घेऊन जात होते. बुके तयार करताना प्लॅस्टिकचा वापर होत असे. परंतु बंदीमुळे ग्राहकांकडून येणाऱ्या बुकेच्या मागणीत घट झाली आहे.

सोनचाफ्यासारखी फुले 10 रुपयांस 10 नग या भावाने उपलब्ध असतात. प्रामुख्याने घरातील देवाला वाहण्यासाठी नागरिक ही फुले घेतात. त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर केला जात असे. परंतु आता बंदीमुळे शेतकऱ्यांना 700 ते 800 रुपये किलो या भावाने ही फुले विकावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे फुलांचे हार ओले होतात. त्यांना कागदाचे वेष्टण केल्यास ते लगेचच खराब होते. त्याचप्रमाणे घरगुती फुलपुडे देणाऱ्या व्यावसायिकांनाही पावसामुळे फुलपुडे ओले होत होऊन कागद फाटत असल्याने नुकसान सोसावे लागत आहे.

घाऊक विक्रेत्यांना बंदीचा फारसा फरक पडणार नाही. कारण त्यांच्याकडून फुले घेणारे ग्राहक कापडी पिशव्या, पोती बरोबर घेऊनच येत असतात. परंतु किरकोळ विक्रेत्यांवर परिणाम होत आहे. बुकेसाठी वापरण्यात येणारी जरबेरा, कार्निशिया यासारखी फुले नाजूक असतात. प्लॅस्टिकच्या पिशवीत त्यांचे पॅकिंग न केल्यास या फुलांची पाने गळण्याची शक्‍यता असते.
- गणेश आहेर, पिंपरी मंडईतील घाऊक आणि किरकोळ विक्रेते.

आम्ही रोज सकाळी दहा रुपयांचा फुलपुडा आणत होतो. त्यासाठी आता कागदी पुड्यातून हा पुडा घ्यावा लागत आहे.
- अनिता कुलकर्णी, चिंचवड

विवाहसमारंभासाठी प्लॅस्टिकचा वापर
पिंपरी येथील एका विक्रेत्याकडे मुंबईतील एका लग्नात मोटार सजविण्याठी सोमवारी एक तरुण आला. परंतु प्रवासात फुले खराब होऊ नयेत, यासाठी माझ्याकडे सजावटीसाठी प्लॅस्टिकचा वापर करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्या तरुणाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले.

आकडेवारी

  • घाऊक फुलविक्रेते - 32
  • किरकोळ फुलविक्रेते - 400
  • फुले उत्पादक शेतकरी - 800 ते 900
  • फुलांची रोज विक्री - सुमारे 32 हजार किलो
  • होणारी रोजची आर्थिक उलाढाल - 50 लाख रुपये
Web Title: effect for Plastics Flowers Professionals