esakal | मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवा - मुंडे 
sakal

बोलून बातमी शोधा

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवा - मुंडे 

 ""मागासवर्गीय समाजातील नागरिकांच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी "बार्टी' संस्थेच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात,'' अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. 

मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवा - मुंडे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ""मागासवर्गीय समाजातील नागरिकांच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी "बार्टी' संस्थेच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात,'' अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. 

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये (बार्टी) शनिवारी आयोजित बैठकीत मुंडे यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. "बार्टी'चे महासंचालक कैलास कणसे, अपंग कल्याण विभागाच्या आयुक्‍त प्रेरणा देशभ्रतार, समाजकल्याण विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त भीमराव खंदाते, "बार्टी'चे प्रकल्पाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी "बार्टी'च्या योजनांची व्याप्ती वाढवून त्या तळागाळापर्यंत पोचवाव्यात. त्यासाठी आधुनिक समाजमाध्यमांचा वापर वाढविण्यात यावा. जातपडताळणी प्रक्रिया सोपी आणि कमी कालावधीत व्हावी. लोकसेवा, राज्यसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी यशस्वी व्हावेत. महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. सुशिक्षित युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नागपूर, औरंगाबादसह अन्य ठिकाणी लोकसेवा, राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात यावेत. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्याच्या मागणीचा अभ्यास करून कौशल्य प्रशिक्षणाचे कोर्सेस सुरू करावेत, अशी सूचना मुंडे यांनी केली. 

औरंगाबादमध्ये अद्ययावत प्रशिक्षण केंद्र 
"बार्टी'च्या वतीने औरंगाबाद येथे लवकरच अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी बैठकीत दिली. तसेच, वंचित घटकांच्या बालकांसाठी के. जी. टू पी. जी. शिक्षण व्यवस्था असलेली अत्याधुनिक सुविधांनी युक्‍त सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

loading image