समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

शरद पवार म्हणाले... 
- राज्य सरकारकडून पन्नास टक्केदेखील कर्जमाफी झालेली नाही 
- नेपाळमध्ये जुन्या भारतीय चलनातील नोटा बदलून दिल्या जात आहेत 
- जनतेचा मूड भंडारा-गोंदियाच्या विजयामुळे दिसून येतोय 
- पालघरचा भाजपचा विजय खरा नाही, सर्व पक्षांच्या मतांची बेरीज केल्यास त्यांचा पराभवच

पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिन आणि हल्लाबोल सभेच्या समारोपात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते. पवार यांनी भाषणात केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 

पवार म्हणाले, ""माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात कोणीही विरोधी पक्षनेता नव्हता, तरीही समविचारी पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टीची सत्ता आणली. त्यामुळे देशात पर्याय देण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येण्याची मानसिकता झाली आहे. राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष पर्याय ठरतात; पण त्यांना एकत्र आणले पाहिजे. तसे झाल्यास भाजपचा शंभर टक्के पराभव होईल. विविध पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला आता सर्वांनी साथ द्यावी.'' 
मशिनचा वापर करून त्यातून निवडणुका जिंकायचे हे भाजपचे सूत्र आहे. भाजप सोडून सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, आपण एकत्र येऊ निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि इथून पुढे ईव्हीएमद्वारे मतदान नको, पारंपरिक पद्धतीनुसार मतदान घ्या, अशी मागणी करू पवार असे त्यांनी या वेळी सांगितले. 

या प्रसंगी मुंडे, पाटील, तटकरे, पटेल, अजित पवार यांचीही भाषणे झाली. 

कोरेगाव भीमा दंगलीशी ज्यांचा संबंध नाही, त्यांना पकडले 
कोरेगाव भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र, एल्गार परिषदेच्या आयोजनाच्या नावाखाली ज्यांचा काहीही संबंध नाही, त्यांना अटक केली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आता तर धमकीचे पत्र आले असे जाहीर करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र, धमकीच्या पत्रात दम नाही, या शब्दांत पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 

शरद पवार म्हणाले... 
- राज्य सरकारकडून पन्नास टक्केदेखील कर्जमाफी झालेली नाही 
- नेपाळमध्ये जुन्या भारतीय चलनातील नोटा बदलून दिल्या जात आहेत 
- जनतेचा मूड भंडारा-गोंदियाच्या विजयामुळे दिसून येतोय 
- पालघरचा भाजपचा विजय खरा नाही, सर्व पक्षांच्या मतांची बेरीज केल्यास त्यांचा पराभवच

Web Title: Efforts to gain sympathy from the threat letter says sharad pawar