सोनसाखळी चोरीचे आठ गुन्हे उघडकीस 

anwar.jpg
anwar.jpg


पुणे : सलग सात दिवस केलेल्या नाकाबंदीमुळे चंदननगर पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या आठ गुन्ह्यांत आरोपी असलेले दोन अल्पवयीन सख्खे भाऊ पकडले आहेत. त्यातील थोरल्या भावावर चिखली आणि नगर रस्ता परिसरातील चोरीचे एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. 

चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार खराडी परिसरात गेल्या सात दिवसांपासून नाकाबंदी करण्यात आली होती. रविवारी (ता. 10) सायंकाळी खराडी बाह्यवळण मार्गावर दुर्गामाता मंदिराजवळ हे दोन अल्पवयीन आरोपी दुचाकीवरून हडपसरच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिस हवालदार पंडित गावडे, मोहन वाळके, रवींद्र रोकडे, अजित धुमाळ, तुषार आल्हाट, प्रदीप सोनवणे, राजेंद्र दीक्षित, चेतन गायकवाड, दत्ता शिंदे, शकूर पठाण, अमित जाधव, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, प्रशांत दुधाळ, बापू लोणकर, संदीप येळे, विक्रांत सासवडकर, परशुराम शिरसाट, अतुल जाधव यांच्या पथकाने त्यांना अटक केली. 

अटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेतल्यावर दहा तोळे वजनाचे दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले. हे दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असून त्यातील थोरल्या भावावर चिखली भागात गोडाऊन फोडून चोरी करण्याचे दहा गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत. 

वेगाने धावणारी दुचाकी वापरून ही टोळी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरते. या दोघा भावांसोबत सोनसाखळी चोरीच्या घटनांत आरोपी असलेला मंगलसिंग बजरंगसिंग नानावत हा साथीदार यापूर्वीच चाकण एमआयडीसी पोलिस ठाणे येथे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेला असून, तो सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याला ताब्यात घेऊन सोनसाखळी चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी दिली. 

वीस ठिकाणचे तपासले सीसीटीव्ही फुटेज 
-------------------- 
मतमोजणीच्या दिवशी (24 ऑक्‍टोबर) खराडीत सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली होती. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी खराडी ते सणसवाडीपर्यंत वीस ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात संशयित आरोपी आढळून आले होते. त्यांची चोरीची पद्धत, वापरण्यात येणारे वाहन आणि त्यांचे वर्णन हे नाकाबंदी दरम्यान कर्मचाऱ्यांना माहीत असल्यामुळे आरोपी जाळ्यात सापडले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com