एकाच दिवशी नोंदविले आठ पेटंट!

मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व उपप्राचार्य यांनी एकाच दिवशी आठ पेटंट नोंदविण्याचा विक्रम केला. विविध समाजोपयोगी विषयांवरील हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.

बारामतीतील कमलनयन बजाज महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापकांची कामगिरी

बारामती शहर (पुणे) : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व उपप्राचार्य यांनी एकाच दिवशी आठ पेटंट नोंदविण्याचा विक्रम केला. विविध समाजोपयोगी विषयांवरील हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने पेटंट नोंदणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. या संशोधनात डॉ. सुधीर लांडे, विनय नगलकर, ज्योती रंगोले व बाळासाहेब पाटील या शिक्षकांबरोबर ऐश्वर्या फुलारी, वैजनाथ खोमणे, ऋषीकेश काळे, निवृत्ती कदम, पूनम पवार, वैष्णवी विधाते, समता सुरवसे, श्रद्धा राजे, अनिकेत होले, प्रतीक्षा गायकवाड, सौरभ काळेबेरे, निर्मल कुंभार, पूनम जाधव, वैष्णवी कानडे, चैतन्य साबळे, शुभम हणमंते, संकेत अर्डे, शिवप्रिया यादव, पायल यादव, स्वानंद खळदकर, माउली शिंदे, मयूर शिंदे, इलक्किया सुंदरम, शुभांगी खुसपे, नीलम कळसकर, शोभा कुचेकर हे विद्यार्थी सहभागी होते.

संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, खजिनदार रमणिक मोता, विश्वस्त सुनेत्रा पवार, ऍड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.

काय आहेत पेटंट
1) लो कॉस्ट ऍग्रो फॉरेस्टरी प्लॅंट सिक्‍युरिटी सिस्टिम यूजिंग पीआयसी मायक्रो कंट्रोलर ः या संशोधनात एक किट तयार केले आहे. ते झाडावर बसविल्यास वृक्षतोडी वेळी होणाऱ्या आघातांमुळे झाडात तयार झालेली कंपने मालकास मोबाईलवर संदेश देतात. अनधिकृत वृक्षतोडीसारख्या घटनेस यामुळे आळा बसेल.

2) नेक्‍स्ट जनरेशन हिटिंग अँड लोकेशन आयडेंटीफायर जॅकेट फॉर मिलिटरी पर्सनल - सियाचीनसारख्या अतिशीत प्रदेशात कार्यरत सैनिकांची गरज लक्षात घेऊन उष्णता निर्माण करणारे आणि ती नियंत्रित करता येणारे जॅकेट बनवले आहे. यात एक जीपीएस ट्रॅकर बसविण्यात आला आहे. याबरोबरच सैनिकांच्या शरीराचे तापमान व वातावरणातील तापमान, आर्द्रता हेदेखील जॅकेटवरील डिस्प्लेवर दाखविण्याची सुविधा आहे. भारतीय सैन्यदलात उपलब्ध असलेल्या इतर जॅकेटपेक्षा याचे वजन कमी आहे.

3) इझी केअर स्मार्ट वॉटर बॉटल फॉर नेक्‍स्ट जनरेशन ः या स्मार्ट बॉटलमध्ये बर्फाळलेले पाणी 65 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापविण्याची क्षमता असून बाटलीतील पाण्याचे तापमान दाखविणारा डिस्प्ले, प्रत्येक तासाला पाणी पिण्याचा अलार्म, शॉकप्रूफ बॉडी सुविधा आहेत.

4) इलेक्‍ट्रीकल अप्लायन्सेस मॉनिटरिंग अँड सेव्हर डिव्हाईस फॉर इन्स्टिट्यूशन ः यात महाविद्यालयाच्या वर्गात "एमएसबी'च्या खाली एक ट्रान्स्मीटर लावला जातो. महाविद्यालय सुटण्याच्या वेळेनंतर वर्गात जर वीज चालू असेल तर याचा डेटा रिसिव्हरला पाठवला जातो आणि वर्गातील वीज आपोआप बंद होते.

5) डिझाईन ऑफ ऑटोमेटेड शुगरकेन कटर विथ बड डिटेक्‍शन ः यामध्ये इमेज प्रोसेसिंग आणि रासबेरी पायचा वापर करून ज्या उसाच्या कांडीला डोळे आले आहेत, ते पेरं मशिनद्वारे कापले जाते. यामुळे ऊस लागवड करताना लागणारा वेळ, पैसा यांची बचत होते आणि मनुष्यबळ कमी लागते.

6) अँटीथेफ्ट सिस्टिम फॉर इलेक्‍ट्रिक मोटर पंप ः शेतात बसविलेले विजेचे पंप चोरीला जातात. याला आळा घालण्यासाठी सेन्सर आणि कंट्रोलरचा वापर करून मोटर किंवा केबलला काही हानी होत असल्यास शेतकऱ्याला तत्काळ त्याच्या मोबाईलवर संदेश प्राप्त होईल.

7) ऑटोमेटेड कॉटन प्लकिंग रोबोट ः यात विशिष्ट प्रकारचा रोबोट बनविला असून हा रोबोट त्याचा बाहू विशिष्ट कोनात फिरवून कापसाची बोंडे शोधून काढत वेचतो. ही पद्धत कमी खर्चिक आहे.

8) स्मार्ट सर्फेस माउंटिंग डिव्हाईस ः जुन्या पद्धतीच्या सोल्डरींग गनमध्ये आपल्याला दोन्ही हात कामात वापरावे लागतात. नवीन संशोधनात छोट्या आकाराच्या गनमध्येच नायक्रोम वायर आणि फिलर मेटल वायर एकत्रित बसविण्यात आल्या आहेत. जेणेकरून गन आपल्याला एका हाताने व सोप्या पद्धतीने वापरता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight patents filed in one day!