राज्यभरातील शाळांमध्ये 'ई-लर्निंग'; स्मार्ट सिटीचे सॉफ्टवेअर 15 ऑगस्टपासून मोफत मिळणार

E-Learning
E-Learning

पुणे ः पुणे स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेले "ई-लर्निंग'चे सॉफ्टवेअर केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही, तर राज्यभरातील सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही उपयोगात आणले जाणार आहे. 15 ऑगस्टपासून हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून "ई-लर्निंग'द्वारे शिकविण्यासाठी अनेक शाळा महागडे सॉफ्टवेअर विकत घेत आहेत. त्याच्या अपडेशनसाठी दर वर्षी मोठा खर्च शाळांना करावा लागतो. पालकही शाळांमध्ये "ई-लर्निंग'ची सुविधा आहेत का, याची चौकशी करतात. एकंदरीतच तंत्रज्ञानाचा आधार घेऊन, शिक्षण घेण्याचा कल वाढत आहे. परंतु, ही सुविधा राज्यातील सर्वच शाळांमध्ये नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वाहतूक, आरोग्य यांसह शिक्षणक्षेत्रातही काम करत आहे. डिसेंबर 2017 पासून शिक्षणावर काम सुरू आहे. पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत औंध, बाणेर, बालेवाडी येथील तीन शाळांमध्ये "ई-लर्निंग' सुरू केले आहे. याच प्रकारे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा या पद्धतीने शिक्षण देता येईल, असा विचार करण्यात आला आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता तेदेखील यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे राज्यभरातील एसएससी बोर्डाच्या शाळांना हा "ई-लर्निंग'चा अभ्यासक्रम मोफत उपलब्ध होऊ शकणार आहे. याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या सॉफ्टवेअरमधील विषय, धडे बालभारतीकडून प्रमाणित करून घेण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप म्हणाले, ""बालभारती आणि विद्या परिषदेने ठरवून दिल्याप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंतचा "ई-लर्निंग'चा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्याचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यास बालभारतीकडून प्रमाणित करून घेण्याचे काम सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करून पुण्यासह राज्यातील सर्व शाळांसाठी हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध असेल.'' 
 
सॉफ्टवेअरही अपडेट होणार 
या "ई-लर्निंग'च्या अभ्यासक्रमाची मालकी स्मार्ट सिटीची आहे. ज्या संस्थेकडून हे सॉफ्टवेअर तयार करून घेतले आहे, ती पुढील पाच वर्षे त्याची देखभाल करणार आहे. या काळात बालभारतीने एखाद्या विषयाचा किंवा इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला, तरी त्यानुसार सॉफ्टवेअरही अपडेट केले जाणार आहे. त्यामुळे शाळांची अडचण होणार नाही, असे राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com