महाविद्यालयांत ऑगस्टमध्ये निवडणुकांचा गुलाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील निवडणुका घेण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा उजाडणार आहे.

पुणे : पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांत खुल्या निवडणुकांचा गुलाल अखेर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उधळला जाणार आहे. निवडणुकीसंबंधी राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक काल झाली. त्यात सर्व विद्यापीठांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

नव्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात खुल्या निवडणुका घेणे बधनकारक आहे. राज्य सरकारच्या राजपत्रानुसार 31 जुलैपूर्वी निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आणि वेळापत्रक जाहीर करण्याचे बंधन होते. मात्र, अनेक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी ही बाब समन्वय समितीच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर चर्चा होऊन ऑगस्टमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी परिषदा स्थापन करण्याचे बंधन विद्यापीठांना घालण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील निवडणुका घेण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा उजाडणार आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी याबाबत म्हणाले, ""या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर अर्ज भरण्यापासून निवडणुकीची प्रक्रिया तिसऱ्या आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होईल.''

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election in colleges