"गृहनिर्माण'च्या निवडणुकांसाठी सुधारित अध्यादेश काढा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

जुन्या नियमावलीत आवश्‍यक सुधारणा करून निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश काढावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली आहे.

पुणे : राज्यातील अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका नियमावली अभावी ठप्प झाल्या आहेत. जुन्या नियमावलीत आवश्‍यक सुधारणा करून निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश काढावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली आहे.
2014 मध्ये 97 वी घटना दुरुस्ती झाली. त्यावेळी राज्य सरकारने गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली. त्यानुसार प्राधिकरणाद्वारे निवडणूक घेण्यास सुरवात झाली. दरम्यान, राज्य सरकारने अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नवीन अध्यादेश काढला. त्यानुसार अशा सोसायट्यांना स्वत:च निवडणूक घेण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु निवडणुका कशा घ्याव्यात याबाबत नियमावली काढलेली नाही.
राज्यात सुमारे पावणेदोन लाख सहकारी संस्था आहेत. त्यापैकी गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या एक लाखांच्या जवळपास आहेत. तर, अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सोसायट्यांची संख्या 90 हजार आहे. यापैकी बऱ्याच सोसायट्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election in colleges