नव्या प्रभागानुसार मतदार यादीचे काम सुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

सप्टेंबरनंतर मतदार नोंदणी मोहिमेतील अर्जांची पुरवणी यादी निवडणूक आयोगातर्फे पुढील वर्षी 5 जानेवारीला प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांच्या हरकती-सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 21 जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे.

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या नव्या प्रभागानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम महापालिकेने सुरू केले असून, त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीचा आधार घेण्यात येणार आहे; तसेच येत्या 1 जानेवारी 2017 रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्यांचा यादीत समावेश असेल. येत्या 12 जानेवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 

नव्या मतदार यादीवर 17 जानेवारीपर्यंत नागरिकांच्या हरकती-सूचना जाणून घेण्यात येणार असून, त्यानंतर 21 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी यांनी दिली. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यात, 1 सप्टेंबर 2016 मध्ये केलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभाजन करावी; तसेच सप्टेंबरनंतर मतदार नोंदणी मोहिमेतील अर्जांची पुरवणी यादी निवडणूक आयोगातर्फे पुढील वर्षी 5 जानेवारीला प्रसिद्ध केली जाईल.

या पुरवणी यादीचेही प्रभागनिहाय विभाजन करण्यात येऊन प्रा-रूप प्रभागनिहाय मतदार यादी 12 जानेवारीला जाहीर करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत. नागरिकांच्या हरकती-सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 21 जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. कुलकर्णी म्हणाले, ''विधानसभेच्या 1 सप्टेंबरच्या विधानसभानिहाय मतदार यादीचे महापालिकांच्या नव्या प्रभागानुसार विभाजन करण्यात येणार आहे. विधानसभा मतदार यादीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि महापालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रा-रूप मतदार यादीतील एकूण संख्या समान असल्याची खबरदारी घेण्यात येणार आहे. विधानसभेच्या यादीत मतदारांची नावे असूनही ती महापालिकेच्या प्रभागाच्या यादीतून वगळण्यात आली असल्यास, अशा मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.'' 

Web Title: Election commission starts preparing voters list for Pune Municipal Corporation elections