गिरिजा बापट यांचे भाकीत ठरले ‘अहों’च्या विजयाने खरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात, पत्नी गिरिजा बापट यांचे. आपल्या ‘अहों’च्या विजयानंतर गिरिजावहिनींनी मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

पुणे - ‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात, पत्नी गिरिजा बापट यांचे. आपल्या ‘अहों’च्या विजयानंतर गिरिजावहिनींनी मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.   

बापट यांच्या विजयानंतर शहरभर उत्सव साजरा होत असतानाच शनिवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी जल्लोष सुरू होता. बापट यांच्या स्वागतासाठी गिरिजावहिनींनी स्वत: आकर्षक रांगोळी काढून त्यांच्या स्वागताची जोरदार तयार केली.‘‘आमदार आणि मंत्री झाल्यानंतर आम्ही मुंबईत जायचो. तिथे सरकारी बंगल्यात राहायचो. तिथे पाहुण्यांचे खूप छान स्वागत करायचो; पण मुंबईतील घर मला कधीच आपले वाटले नाही,’’ हेही त्यांनी सांगितले. आता खासदार झाल्यानंतर दिल्लीत राहायला आवडेल का, यावर स्मितहास्य करून होकार दिला.गिरिजावहिनींनी बापट यांचा राजकीय प्रवास पाहिला आहे.

बोहल्यावर चढल्याच्या दुसऱ्या वर्षी बापट यांनी पोटनिवडणूक लढवली. १९८४ मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर १९८५ मध्ये बापट यांनी पोटनिवडणूक लढवली.नगरसेवक ते खासदार हा प्रवास त्यांच्या पत्नीने पाहिला. प्रत्येक यशानंतर पत्नीनेही बढतीची स्वप्न पाहिली. बापट कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्यांना दिल्ली गाठायची होती. ते त्यांनी करून दाखविले, असेही गिरिजावहिनीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results Girija Bapat Girish Bapat Win Politics