Election Results : मावळ ‘गढी’वर ‘बारणे’त्सव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट
पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने खराळवाडीतील राष्ट्रवादीचे कार्यालय सकाळपासूनच बंद होते. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर पार्थ यांना किती मते मिळत आहेत, याची माहिती कार्यकर्ते सतत घेत होते. मात्र पार्थ पिछाडीवर पडत गेले, तसतसा कार्यकर्त्यांमधील उत्साह मावळला.

पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी भेटीस येऊ लागली. सकाळी साडेअकरानंतर सामान्यांमध्ये असलेली निकालाची उत्सुकता संपली. कारण मताधिक्‍याने कौल स्पष्ट झाला होता.

दुपारी दोनला शिवसेना कार्यालयासमोर, तर सायंकाळी साडेचारला भाजप कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. ढोल, आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते गायब झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार रिंगणात असल्याने निवडणूक चुरशीची होईल, असा साऱ्यांचा अंदाज होता.

शहरातील भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयामध्ये सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बारणे किती मतांनी पुढे आहेत, किती फेऱ्या झाल्यात, किती बाकी आहेत, याची माहिती कार्यकर्ते सतत घेत होते. मताधिक्‍य जसजसे वाढत गेले, तसतसे त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या संख्येने वाढत गेली. अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली.

नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बारणे त्यांच्या कार्यालयात थांबले होते. मावळमधील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोरवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये सकाळपासूनच तयारी सुरू झाली होती. बारणे यांचे मताधिक्‍य जसजसे वाढत होते, तसतशी भाजप कार्यालयातील गर्दी वाढत गेली. नंतर कार्यकर्त्यांनी फुगड्यांचा आनंद लुटला. पेढे वाटले. केक कापण्यात आला. दरम्यान, बालेवाडी येथील मतमोजणी केंद्राबाहेरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ निकाल ऐकण्यासाठी तुरळक कार्यकर्ते उपस्थित होते.

फटाक्‍यांची आतषबाजी अन्‌ पेढ्यांचे वाटप
चिंचवड - मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली. मात्र, एक लाखाच्या पुढे मताधिक्‍य गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. पवार घराण्यातील व्यक्‍तीला पराभूत केल्याने बारणे हे ‘जायंट किलर’ ठरल्याने प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनीही बारणे यांची प्रतिक्रिया मिळविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

श्रीरंग बारणे घरात बसून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतमोजणीची माहिती घेत होते. त्यांनी चाळीस हजारांचे लीड घेतल्यानंतरही त्यांच्या घराजवळ शुकशुकाट होता. त्यानंतर पावणेअकराच्या सुमारास बारणे यांना ८० हजारांचे मताधिक्‍य मिळाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानासमोर मंडप बांधण्यास सुरवात झाली. त्या वेळी काहीजण त्यांना भेटण्यासाठी आले असता बारणे हे टी-शर्टवरच घराबाहेर आले. 

मात्र, प्रत्येक फेरीमध्ये त्यांचे मताधिक्‍य वाढत चालल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन बारणे यांना शुभेच्छा दिल्या. शहरातही ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी युतीचे झेंडे घेऊन दुचाकीवर विजयी फेरी काढली. काही नगरसेवकांनी आपल्या कार्यालयासमोर फटाक्‍यांची आतषबाजी केली. 

मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार लादला. त्या वेळी ‘मी कोण पार्थ पवार, मी ओळखत नाही,’ असे विधान केले होते. मावळमधील मतदारांनीही पवार घराण्यातील या उमेदवाराला नाकारले आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. मात्र, मावळमधील जनतेने या पैशाला झिडकारले, हे निकालावर स्पष्ट झाले. विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टिकोन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेली संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्‍वास, तसेच मतदारसंघातील युतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मी विजयी झालो. आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी माझे असलेले मतभेद दूर झाले असून, त्यांनीही सर्वशक्‍तीनिशी काम केले.
- श्रीरंग बारणे, खासदार

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्या विश्वासाबद्दल मी त्यांच्या समोर नतमस्तक आहे. आगामी पाच वर्षांत देशात अव्वल लोकसभा मतदारसंघ म्हणून बारामतीचा नावलौकिक अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न मी करेन. पक्ष संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याने केलेले काम व मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे यश मी मिळवू शकले. विकासाबाबतीत जसा गेल्या पाच वर्षांत बारामती मतदारसंघ अव्वल आहे, तसाच आगामी काळातही तो राहील, असा माझा प्रयत्न असेल. पाणी, रेल्वे मंत्रालयासह इतरही विषयांत विविध कामे मार्गी लावण्याला प्राधान्य असेल.
- सुप्रिया सुळे, खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results Maval Loksabha Shrirang Barne Win Politics